तुमसर : तुमसर येथील सांस्कृतिक भवनाच्या कोनशिलेची नासधूस प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी राकाँचे जिल्हाध्यक्षसह शिष्टमंडळाने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना मंगळवारी केली. दोषींवर १५ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. दि.१५ ला लोकमतने सांस्कृतिक भवनाच्या कोनशिलेची नासधूस प्रकरणाचे वृत्त प्रकाशित करताच राकाँला येथे खळबळून जाग आली हे विशेष.तुमसर नगरपरिषदेने शहरात सांस्कृतिक सभागृह आवश्यक आहे, अशी मागणी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली होती. शहरात संताजी सभागृहाच्या शेजारी मॉईलच्या मदतीने सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम मंजूर झाले. तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी २०१४ ला भूमिपूजन झाले होते. तो शिलान्यास काही दिवसांपूर्वी कोनशिला भूईसपाट कुणीतरी केली.मंगळवारी प्रस्तावित सांस्कृतिक भवन परिसराची पाहणी राकाँचे जिल्हाध्यक्ष मधूकर कुकडे यांनी केली. यात शिलान्यासाची जागा पूर्णत: नष्ट करण्यात आली असून काही दगड पाण्यात फेकण्यात आले आहे. हे कृत्य खोडसाडपणे करून शहरात तणाव निर्माण करण्याकरिता व शहराचा विकास होऊ नये तथा प्रफुल पटेल यांना बदनाम करण्याकरिता केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून १५ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात राकाँ जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, राजकुमार माटे, कल्याणी भुरे, अरुण लांजेवार, नगरसेवक सलाम तुरक, जितेंद्र तुरकर, रहमतबेग मिर्झा, अर्शद मिर्झा, विक्रम लांजेवार, सलाम तुरक, कृष्णा बनकर, महेश लिमजे, संजय चोपकर, शैलेश साखरवाडे, गजानन लांजेवार यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
कोनशिला तोडफोड प्रकरण पोहोचले पोलिसात
By admin | Updated: December 16, 2014 22:47 IST