पंचभाई यांचे प्रतिपादन : राजीव टेकडीवर केले वृक्षारोपण पवनी : गोसेखुर्द हा प्रकल्प माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची देण आहे. या धरणामुळे पूर्व विदर्भात हरितक्रांती आणण्याचे राजीव गांधी यांचे स्वप्न होते. परंतु सध्याचे सरकार गोसीखुर्द धरणाचे काम रेंगाळून ठेवत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरण पूर्णत्वाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई यांनी केले. गोसेखुर्द धरणाजवळ तयार होत असलेल्या राजीव गांधी स्मृती भवन परिसरात स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नीळकंठ टेकाम, पवनी पंचायत समितीच्या उपसभापती अल्का फुंडे, युवक काँग्रेसचे महासचिव आशिष माटे, जितेंद्र रेहपाडे, नीला पाथोडे, दादा आगरे, तुळशीदास बिलवणे, अंबादास धारगावे उपस्थित होते. याप्रसंगी राजीव गांधी स्मृती प्रतिष्ठानतर्फे सभापती नीळकंठ टेकाम व उपसभापती अल्का फुंडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभापती नीळकंठ टेकाम यांनी राजीव गांधी यांच्या विचारावर चालण्याचे आवाहन केले. याप्रसंगी या परिसरात १०० रोपट्यांचे रोपण करण्यात आले. संचालन व आभारप्रदर्शन आशिष माटे यांनी केले. याप्रसंगी प्रमोद कोरे, रामचंद्र मेश्राम, नरेंद्र बिलवणे, नरेंद्र मानापुरे, परशुराम समरीत, दिपक आगरे, प्रकाश मेश्राम, सतीश वानखेडे, व्यंकट कठाणे, नामदेव राऊत, विठ्ठल घोरमोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
राजीव गांधी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी गोसेखुर्द धरण पूर्ण व्हावे
By admin | Updated: August 23, 2015 00:52 IST