भंडारा : शेतीच्या वहिवाटीच्या मुद्यावरून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारला तारखेवर आलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. यात झालेल्या मारहाण प्रकरणाची दोघांनीही परस्परांविरूध्द भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मोहाडी तालुक्यातील घाटकुरोडा येथील धनराज चिंतनवार यांनी बुधवारला ‘लोकमत’ कार्यालयात बाजू मांडताना म्हणाले, हरिचंद्र एंचिलवार यांचा धनराज चिंतनवार, शंकर चिंतनवार, ग्यानीराम लकडेस्वार व भय्या ठवकर यांच्याशी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या मुद्यावरून २००६ पासून वाद सुरू आहे. याप्रकरणी मोहाडीचे तत्कालीन तहसीलदार शिंगाडे यांच्याकडे दाद मागितली. २००६ त्यावेळी तहसीलदारांनी रस्ता करुन दिला होता. त्यानंतर एंचिलवार यांनी २००८ मध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केली. हा रस्ता १४ शेतकऱ्यांच्या शेतीवर जाण्याचा असल्याने रस्ता देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, एंचिलवार यांनी २०१४ मध्ये पुन्हा रस्ता अडविला. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार कल्याण डहाट यांनी, मामलेदार कायद्यानुसार रस्ता वहिवाटीसाठी मोकळा करून दिला. एंचिलवार यांनी या प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केली. मंगळवारला या प्रकरणाची तारीख असल्याने हे दोन्ही शेतकरी कार्यालयात पोहोचले असता मामलेदार कायद्यानुसार निर्णय झाला असल्याचे सांगून एंचिलवार यांची अपील फेटाळून लावली. हा निर्णय मान्य न झाल्याने जितेंद्र एंचिलवार याने माझ्या लहान भावाला व्हरांड्यात मारहाण केली. त्याला मारहाणीतून सोडवून भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दरम्यान हरिचंद्रचा मुलगा जितेंद्रने २०१४ मध्ये धनराजचे वडील कवडू यांच्यावर याच वादातून कुऱ्हाडीने हल्ला वार केले होते. याप्रकरणी जितेंद्रविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि ३२४, ३२६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. एंचिलवार कुटुंबाकडून माझ्या परिवाराला धोका असून प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही चिंतनवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. (शहर प्रतिनिधी)
परस्परांविरूद्ध तक्रारी दाखल
By admin | Updated: September 24, 2015 00:45 IST