भंडारा : महाराष्ट्रात दलितांच्या हत्याकांडाची संख्या सारखी वाढत चालली आहे. पोलीस तपासातील आणि न्याय प्रक्रियेतील विलंबामुळे व अनिश्चितेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात अविश्वासात व नैराश्य वाढत चालले आहे. खरे तर अशा अमानुष हत्याकांडांना जबाबदार असलेल्या जातीयवादी मानसिकतेचे पूर्ण निर्मूलन करण्याची गरज आहे. अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील विविध पुरोगामी संस्था-संघटनांच्यातर्फे करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड दलित हत्याकांडांचा तीव्र धिक्कार करणारी एक निषेधसभा भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या निषेध सभेत भंडारा जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक सांस्कृतिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जवखेड दलित हत्याकांडाचा जळजळीत निषेध व्यक्त केला.या निषेध सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी या राजकीय पक्षांसह युगसंवाद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, युगदर्पण, ब्ल्यू पँथर ग्रुप, वैनाकाठ फाऊंडेशन इत्यादी सामाजिक-सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समाजातील दलितविरोधी मानसिकेतेचा तीव्र धिक्कार केला. यावेळी सुभंत रहाटे यांनी शासनाने आपले दलितविरोधी अध्यादेश परत घेण्याची मागणी केली. अमृत बन्सोड यांनी महाराष्ट्रातील दलित शक्तीच्या विघटनामुळेच दलितविरोधी मानसिकता बळावत चालल्याचे समाजवास्तव म ांडले. दलितांच्या अमानुष हत्याकांडाच्या प्रसंगी केवळ निषेध नोंदवून शांत बसण्यापेक्षा समाजातील सर्व घटकांनी सनदशीर मार्गाने प्रखर प्रतिकार केला पाहिजे, असे मत महेंद्र गडकरी यांनी मांडले. या निषेध सभेत सी.एम. बागडे, डॉ.सुरेश खोब्रागडे, हर्षल मेश्राम, यशवंत वैद्य, सदानंद इलमे, हिवराज उके, विष्णू लोणारे, हाजी सलाम, असित बागडे, गुलशन गजभिये, निर्मला गोस्वामी या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सर्व उपस्थितांच्या वतीने निषेधाचा ठराव प्रमोदकुमार अणेराव यांनी मांडला. निषेध सभेचे संचालन प्रा.विनोद मेश्राम यांनी तर समारोप डॉ.अनिल नितनवरे यांनी केला. यावेळी विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
जातीयवादी मानसिकतेचे निर्मूलन झाले पाहिजे
By admin | Updated: November 8, 2014 22:33 IST