लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाच्या वतीने गतवर्षी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि राज्यांतील विविध तीर्थस्थळांचे दर्शन घडविले जाते. नुकतेच बुद्धगयेसाठी अनेक ज्येष्ठ नागरिक रवाना झाले आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली.
राज्य शासनाने गतवर्षी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. या योजनेमुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजनेतंर्गत तीर्थाटनांचा लाभ मिळत आहे. योजनेअंतर्गत गतवर्षी ५ ऑक्टोबरला जिल्ह्यातील ६० वर्षावरील ८०० ज्येष्ठांना अयोध्येला जाण्याची संधी उपलब्ध झाली. सर्व खर्च मोफत होऊन श्रीरामांचे दर्शन ज्येष्ठांना घेता आले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत देशातील प्रमुख १४, तर महाराष्ट्रातील ९५ तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ज्येष्ठांना फिरायला जाण्याची संधी उपलब्ध होते.
योजनेचे निकष काय?महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय ६० वर्षे पूर्ण झाले असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जन्मदाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, जवळच्या नातेवाइकाचा मोबाइल क्रमांक देणे गरजेचे आहे.
काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाराज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येतो. त्यामुळे मोफत दर्शन घेण्याची संधी मिळते.जिल्ह्यातील सहायक आयुक्त, कार्यालय समाजकल्याण विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे.