विलास बन्सोड उसर्रामहिला शिकली म्हणजे, सर्व घर शिक्षित होते. ही प्राचीनकाळात म्हण प्रचलित होती. त्याच युक्तीप्रमाणे आधुनिकतेत महिलांनी पुढाकार घेतला तर गाव सुधारते, असे दृढले आहे. या उक्तीप्रमाणेच ताडगावात आता महिलांनी दारूबंदीसाठी कंबर कसली असून महिला शक्तीच्या एकवटल्याने गावात दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला आहे.दारूच्या आहारी गेल्याने ताडगांव येथील अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून अनेकांचे छत्र हरपले आहे. कित्येकांवर आर्थिक संकट ओढवले असतानाही केवळ व्यसन पूर्ण करण्यासाठी शेती व गृहपयोगी साहित्याची विक्री करण्यातही अनेकांनी मागेपुढे बघितलेले नाही. दारूमुळे गावातील शांतता पुर्णत: बिघडली आहे. यामुळे अनेकदा तंटे होतात. यावर वचक निर्माण व्हावी, यासाठी शासनाच्या स्तुत्य उपक्रमापैकी तंटामुक्त गाव समितीची निर्मिती करण्यात आली आहे. तेव्हापासून काहीप्रमाणात तंटे कमी झाले. मात्र, दारूची कधी खुलेआम तर कधी छुप्या मार्गाने विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला, विशेषत: महिलांमध्ये दारूविक्रेत्यांप्रती आक्रोष आहे.मोहाडी तालुक्यातील ताडगांव (सिहरी) येथील महिलांनी आता 'दुर्गा'चे रूप धारण केले आहे. त्यांनी संपूर्ण गाव दारूमुक्ती साठी कंबर कसली आहे. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत महिलांनी लाक्षणीय उपस्थिती लावून गावातील दारूबंदी करण्यासाठी ठराव पारित केला. त्यानंतर त्यांनी लगेच दारूबंदी समिती गठित केली. यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. गाव दारूबंदी करण्याचा ठराव समितीच्या माध्यमातून आंधळगांवचे ठाणेदार काळबांधे यांना देण्यात आले. यानंतर २३ फेब्रुवारीला ताडगाव येथे ठाणेदार काळबांधे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण गावात दारूबंदी करण्याच्या दृष्टीने सभा घेण्यात आली. या सभेला ताडगांव येथील महिलांची अभूतपूर्व हजेरी होती. महिलांच्या उपस्थितीने पुरूषवर्गही अचंबित राहिला. या सभेत महिलांनी मांडलेल्या विषयाला काही पुरूषांचा विरोध असला तरी, स्त्रीशक्तीच्या पुढे त्यांचे काहीएक चालले नाही. त्यामुळे उपस्थित पुरूषांनीही महिलांच्या निर्णयाला संमत्ती दिली. या सभेला सरपंच बिरज वनवे, इस्तारी बेलेकर, उपसरपंच अल्का बांते, रतिराम हलमारे, ग्रामसुरक्षा दलाचे रामशंकर गायधने, दिनेश धुमनखेडे, चंद्रकांत गायधने, दिनेश खराबे, प्रमोद धांडे, अरविंद गायधने, दीपक अतकरी, बादल नागलवाडे, रमेश हलमारे, संभा धांडे, शिवशंकर डहाके, रमेश धांडे, भगवान वच्छेरे, महेश पराते, अशोक वैद्य, नटवर पारधी आदींनी दारूबंदी करण्यासाठी सहकार्य केले.
दारूबंदीसाठी ताडगावातील 'स्त्रीशक्ती' एकवटली
By admin | Updated: March 16, 2015 00:28 IST