शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुकास्तरावर विशेष शिबिरांच्या माध्यमातून शिक्षकांचे लसीकरण केले जात आहे. यासोबतच ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी पालकांकडून परवानगी घेणेसुद्धा बंधनकारक राहील. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही बहुतांश ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाहीत. तसेच अनेक ग्रामपंचायतीचे ठरावच झालेले नाहीत. ठराव नसल्याने शिक्षण विभागाची दुविधा वाढली आहे.
बॉक्स
अशी राहणार व्यवस्था
▪️ एका बाकावर एकच विद्यार्थी
▪️ दोन बाकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर
▪️ एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थ्यांची उपस्थिती
▪️ सतत साबणाने हात धुणे
▪️ मास्कचा वापर
▪️ कोणती लक्षणे आढळताच विद्यार्थ्याला त्वरित घरी पाठवून त्याची चाचणी करून घेणे.
बॉक्स
पालकांना नसणार परवानगी
शाळा सुरू करण्यापूर्वी किमान एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आलेला नसावा, शंभर टक्के लसीकरण या प्रमुख अटी असल्या तरी गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळा प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. ज्या शाळेत एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ती शाळा तत्काळ बंद करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत.
कोट
मुरमाडी (तुपकर), शिवनी (मोगरा) ग्रामपंचायतीचे ठराव आलेले आहेत. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीचे ठराव आलेले नाहीत. सायंकाळपर्यंत किती ग्रामपंचायतीचे ठराव येतात हे बघणार आहोत. त्यामुळे प्रत्यक्षात किती शाळा सुरू होणार हे १५ जुलैलाच माहीत होईल.
- सुभाष बावनकुळे, गटशिक्षणाधिकारी, लाखनी