मोहाडी : लहानग्या हाताने विविध व्यंजनांची गोड तिखट चव देणाऱ्या आनंद मेळाव्यात परिसरातील शाळा, गावकऱ्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. उद्योगशिल व स्वकमाईच्या उपक्रमाचा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने भरभरून स्तूती केली.जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा मोहगाव देवी येथे विनायक मोथारकर, जे.एस. आंबीलढुके या शिक्षकांच्या विशेष प्रयत्नाने शाळेच्या परिसरात एकदिवसीय आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहगावच्या केंद्रीय शाळेत झालेल्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन सरपंच राजेश लेंडे यांनी केले. अतिथी म्हणून परमेश्वर लेंडे, खुशाल माकडे, तृप्ती भोंगाडे, सत्यवान लेंडे, वसंता लांबट, मनोहर ठवकर, मुख्याध्यापक आर.टी. सेलोकर, महात्मा ज्योतिबा फुले शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, हेमराज राऊत, शोभा कोचे, वर्षा ढोमणे, गजानन वैद्य, गोपाल मडामे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. स्वकर्तृत्वाने लहान बालकेही उंच भरारी मारू शकतात. केवळ त्यांना दिशा देणारे पथदर्शक हवेत असे विचार सरपंच राजेश लेंडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये कला उपजत असते. त्या कलेला हवी असते व्यासपीठ निर्माण करून देण्याची असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी व्यक्त केले. यावेळी मनोहर ठवकर, परमेश्वर लेंडे यांनीही मार्गदर्शन केले. आनंद मेळाव्यात चुलबुले, चारचौघी, दो दोस्त या विविध नावाने विद्यार्थ्यांनी २५ स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी, पावभाजी, भजे, चाय, मिसळ, दोसा, इडली, पोहा, कच्चा चिवडा याशिवाय विविध व्यंजनांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी फनगेम एका विद्यार्थ्यांने लावला होता. आनंद मेयाव्यात महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल येथील १५० विद्यार्थ्यांनी विविध स्वजनांचा आस्वाद घेतला. गावकऱ्यांनी तसेच शिक्षक वर्गानी या आनंद मेळाव्यात पदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. लहानग्या विद्यार्थ्यांनी स्वत:चे हाताने विविध पदार्थ तयार करून खरी कमाई केली. या स्तुत्य उपक्रमाला पंचायत समिती मोहाडीचे गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे, प्रदीप गणवीर, विस्तार अधिकारी पडोळे यांनी शुभेच्छा दिल्या. उपक्रमांची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे संचालन विनायक मोथारकर तर उपस्थितांचे आभार जे.एस. आंबीलडुके यांनी व्यक्त केले. किशोर कांबळे, मिना कुलरकर, सुनंदा सेलोकर, आशा निमकर, रंजना तांबे, गोपाल मडामे या शिक्षकांनी आनंद मेळावा यशस्वी होण्यास सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
बालकांनी मेळाव्यात आणला ‘स्वाद’
By admin | Updated: November 25, 2014 22:51 IST