बघेडा ते चिचोली मार्गावरची व्यथा : गर्रा बघेडा गावातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, एस.टी. महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हमोहन भोयर तुमसरगाव तिथे एस.टी. असा दावा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने या ब्रीद वाक्याला हरताळ फासला आहे. परिणामी बघेडा ते चिचोली फाट्यापर्यंत शाळकरी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरने प्रवास करावा लागत आहे. गर्रा - बघेडा हे गाव सांसद आदर्श ग्राम आहे, हे विशेष.तुमसरपासून १५ कि.मी. अंतरावर सांसद आदर्श ग्राम गर्रा बघेडा आहे. येथील विद्यार्थी - विद्यार्थिनी शिक्षणाकरिता तुमसर येथे दररोज येतात. शाळेच्या वेळेवर येथे बस उपलब्ध राहत नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास योजनेच्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. बघेडा येथील शालेय विद्यार्थी चिचोली फाट्यापर्यंत ट्रॅक्टरने प्रवास करतात. धोका पत्करून विद्यार्थ्यांना जावे लागते. शाळेच्या वेळापत्रकानुसार बसेस सोडण्याच्या सूचना राज्य शासनाने त्या-त्या आगाराला दिल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी होत नाही.गर्रा बघेडा हे गाव सांसद आदर्श ग्राम आहे. या गावाला विशेष सेवा पुरविण्याचे निर्देश आहेत. खासदार नाना पटोले यांच्या दत्तक गावाची ही समस्या असेल तर अन्य गावांचा विचार न केलेला बरा.मानव विकास योजनेच्या बसगाड्या वेळेवर भंडारा रोड, माडगी येथील सीबीएसई शाळेकरिता सोडण्यात येतात. दुसरीकडे मानव विकास बसऐवजी लाल रंगाच्या बसमधून प्रवाशांसोबत विद्यार्थिनींना प्रवास करावा लागतो हे विशेष.तुमसर आगारात कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्पतुमसर आगारात चालक व वाहकांची १४१ - १४१ अशी मंजूर पदे आहेत. त्यापैकी सध्या १२२ चालक तर ११७ वाहक आहेत. १९ चालक व २४ वाहकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक तयार करताना आगारप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी पदे भरण्याची गरज आहे.
आदर्श गावातील विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरने शालेय प्रवास
By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST