आंदोलनाचा इशारा : भंडारा महावितरणमधील प्रकारभंडारा : महावितरणचे मुख्य अभियंता बी. के. जनवीर हे अधिनस्थ कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. सोबतच दडपशाही व मनमानी कारभार करीत असल्याने भंडारा महावितरणमधील अभियंता व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निषेधात काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. जनवीर यांनी माफी न मागितल्यास लेखनीबंद व असहकार्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याच्या कामकाजासाठी गोंदिया परिमंडळाची निर्मिती केली आहे. याचे मुख्य अभियंता बी. के. जनवीर हे आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून जनवीर हे त्यांच्या अधिनस्थ अभियंता व वीज कर्मचाऱ्यांना आढावा बैठकीत बोलावून कामकाजाच्या नावावर अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. त्याचप्रमाणे सभेत नियमबाह्य कारवाई करण्याची धमकी देवून दडपशाहीचे धोरण अवलंबितात. यासोबतच अभियंत्यांना वैयक्तिक पातळीवर अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. एवढ्यावर मुख्य अभियंता न थांबता त्यांनी कळस गाठताना, महिला अभियंत्यांनासुध्दा असभ्य भाषेचा वापर करून शिवीगाळ करीत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.याबाबत भंडारा महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने मुख्य अभियंता बी. के. जनवीर यांच्या विरूध्द आंदोलन पुकारले आहे. याबाबत कृती समितीने जनवीर यांना त्यांच्याकडून होत असलेल्या अन्याबाबात माहिती दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये जनवीर यांच्याविरूध्द असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सात दिवसात जनवीर यांनी लेखी माफीनामा कृती समितीला सादर करावा, अशी मागणी केली आहे. तसे न केल्यास कृती समितीकडून आंदोलन छेडण्याचा इशारा महेश मेश्राम, प्रशांत भोंगाडे, पी. डी. पवार, एम. गौपाले, सुशिल शिंदे, कुरेशी व दिलीप बोंद्रे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
मुख्य अभियंत्याकडून कर्मचाऱ्यांना शिव्यांचा ‘करंट’
By admin | Updated: March 4, 2016 00:32 IST