शिक्षक परिषदेचे निवेदन : संघटनेतर्फे उपोषण पवनी : शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी होणारी हयगय तसेच शिक्षक आमदारांनी दाखल केलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली. शिक्षण विभागाच्या या कृतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने आधी लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विविध शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या कायम असून त्या निकाली काढण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यासोबत सहविचार सभा आयोजित केल्या जातात. सभा आयोजित होतात पण त्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. आमदार नागो गाणार यांनी यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. याविरोधात ८ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. समस्या निकाली न निघाल्या तर १६ फेब्रुवारीपासून परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. उल्हास फडके यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यात साकोली तालुक्यातील शिक्षकांसह अन्य शिक्षक उपस्थित होते. अशोक कापगते, प्रदीप गोमासे, रामकृष्ण हारगुडे, मनिषा काशिवार, सुधा हारगुडे, पुष्पा बोरकर, हेमराज भाजीपाले, यु.एन. कटकवार, व्ही.आर. मारवाडे, अमोल हलमारे, खर्डेकर, डोमळे, डी.पी. बारापात्रे, महादेव सोनवाने, निर्मला परिहार, लोकनाथ नवखरे, अरुण झोडे, ज्ञानेश्वर संग्रामे, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समस्यांना केराची टोपली
By admin | Updated: February 9, 2016 00:32 IST