नदीत कार कोसळली : तीन जण बुडाल्याची शक्यता, नागपूरहून बोलाविले गोताखोरांना भंडारा : काल मंगळवारला रात्री वैनगंगा नदी पुलावरून कोसळलेल्या इंडिका कारच्या शोधासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली. मात्र १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतरही बचाव दलाला नदीत बुडालेली कार गवसली नाही. नागपूर येथील गोताखोरांना बोलाविण्यात आले असून रात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते. नदीत कार कोसळल्याची वार्ता शहरात पसरताच दिवसभर सर्वांच्या तोंडी हीच चर्चा होती. नागरिकांचे जत्थे नदीच्या दिशेने जात होते. त्यामुळे नदीकाठावर नागरिकांची चांगलीच गर्दी जमली होती. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कारधा जुना पुलावरून कार नदीत कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासूनच पोलिसांनी बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली. रात्रीही शोधकार्य करण्यात आले. बुधवारला सकाळपासून या शोधकार्यासाठी पोलिसांनी मोटर बोट, दोरखंड, बांबू यांचा वापर करीत होते. यासाठी तरबेज गोताखोरांची मदत घेण्यात आली होती. परंतु शोध पथकाच्या हातात काही लागले नव्हते. घटनास्थळी महसूल विभागाचे अधिकारी व भंडारा पोलिसांचा ताफा असून पोलीस अधिकारी सचिन गोरे हे शोधकार्यासंबंधी आवश्यक त्या सूचना देत आहेत. (प्रतिनिधी)
१८ तासांच्या शोधमोहिमेनंतरही कार बेपत्ता
By admin | Updated: August 13, 2014 23:38 IST