करडी ( पालोरा ) :- करडी आरोग्यवर्धिनी केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाइन सेल्फ रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. नोंदणीची माहिती, अनेकांकडे ॲण्ड्राॅइड मोबाइलचा अभाव असल्याने परिसरातील नागरिक लसीपासून वंचित आहेत. या गर्दीमुळे कोरोना संक्रमणाची धास्ती व्यक्त होत असून, ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधेप्रमाणे १८ ने ४४ वयोगटातील तरुणांना स्थानिक स्तरावर विनारजिस्ट्रेशन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
करडी आरोग्यवर्धिनी केंद्रात सध्या नागपूर, मौदा, गोंदिया व अन्य शहरांतील नागरिकांची वर्दळ लसीकरणासाठी दिसून येत आहे. मात्र, स्थानिकांना नोंदणीशिवाय लस मिळण्यास अडचणीचा सामना करावा लागत असल्याने शासन, प्रशासनाच्या धोरणा विरुद्ध नागरिकांत असंतोषाची भावना व्यक्त होत आहे, तर स्थानिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
नोंदणी करून येणारे नागरिक बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याच्या संचारामुळे एखादा कोरोना पॉझिटिव्ह असल्यास इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.
बाहेरून येणारे नागरिक एकाच दुचाकी व चारचाकी वाहतून येत असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. या नागरिकांनाही त्यांच्या स्थानिक स्तरावर लसीकरणाची सोय झाल्यास उपयुक्त ठरणार आहे.
करडी परिसरातील ३५ हजार लोकसंख्येसाठी हे एकमेव आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. परिसरातील तरुणांमध्ये लसीकरणाची प्रबळ इच्छा आहे; परंतु शासनाच्या विरोधाभासी निर्णयामुळे तरुणांत नाराजीचा सूर आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांप्रमाणे १८ ते ४४ वयोगटासाठीही नोंदणीची अट रद्द करून सरळ सरळ मागेल त्याला कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
करडी आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आहे; परंतु सध्या या केंद्रावर बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे. स्थानिक मात्र ऑनलाइन नोंदणीच्या अटीमुळे लसीपासून वंचित आहेत. शासन व जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून यापूर्वीप्रमाणे विनानोंदणी सर्वांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.