भीम गितांचा कार्यक्रम : चर्चासत्रात मान्यवरांनी घेतला सहभागलाखनी : तालुक्यातील मचारना जेवनाळा येथे बौद्ध संमेलन पार पडले. याप्रसंगी गावातून धम्मरॅली काढून आनंद विहारासमोर धम्मध्वजाचे रोहण करण्यात आल्यावर भिक्खूसंघा द्वारे विहारात तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची विधिवत प्रतिस्थापना करण्यात आली. त्यानंतर भिक्खू संघाकडून उपस्थितांना धम्माबाबतचे प्रबोधन करण्यात आले.दुसऱ्या सत्रात रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते आनंद बुद्ध विहाराचे उद्घाटन करून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावरण झाले. दुपारी २ वाजता धम्म संमेलनाला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख तुलसीराम गेडाम हे होते. मंचावर रिपब्लिकन सेनेचे काशिनाथ निकाळजे, भाई सावंत, संजिव बौधनकर मुंबई, योगेंद्र चवरे, अॅड.तेलगोटे अकोला, बाळू टेंभुर्णे गडचिरोली हे उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता भीमशंकर गजभिये यांनी प्रास्ताविकात म्हणाले, शासनमान्य बौद्धांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याने प्रत्येकाने कागदोपत्री बौद्ध नोंदवावे. तद्वतच आंबेडकरी चळवळ पूर्ववत आणण्यासाठी एक पक्ष एक नेता हे धोरण समाजाने स्वीकारावे असे आवाहन केले. यावेळी आनंदराज आंबेडकर, भाई सावंत, काशिनाथ निकाळजे, अचल मेश्राम, सभापती विनायक बुरडे आदींनी आपल्या भाषणात समता, मैत्री आणि बंधूभाव या भगवान बुद्धाच्या संदेशातून समाजाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले.यावेळी माजी सभापती राजू हटनागर, शिशुपाल ढोके मचारणा, सचिन गजभिये नागपूर या दानकर्त्यांचे तसेच डी.जी. रंगारी गुरूजी साकोली यांना राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तुलसीराम गेडाम लिखीत ‘खरे बौद्ध बना’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे धम्ममंचावरून पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. धम्म संमेलनात आजूबाजूच्या गावातील दहा बारा हजार लोक उपस्थित होते. जनसमुदायाने रात्री प्रवीण भिवगडे व संच नागपूर यांच्या बुद्ध भीम सुमधूर गीतांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमासाठी नंदकुमार ढोके, यशवंत गेडाम, अनमोल ढोके, विजय सोनटक्के, मधुकर ढोके, शिवदास मेश्राम, प्रकाश ढोके, पुरुषोत्तम दहीवले, शर्मीला ढोके, भूमिता सोनटक्के, बेगन गेडाम, फुलन खोब्रागडे, वैशाली ढोके, मंगला ढवरे, देवरेषा दहिवले यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन विलास दहीवले यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
मचारना येथे बौद्ध संमेलन
By admin | Updated: March 1, 2016 00:27 IST