चिंचोली येथील वन विभागांतर्गत प्रकार.
वारसा जतन करण्याची गरज
तुमसर : सातपुडा पर्वतरांगांत असलेल्या चिंचोली येथे वन विभागाची ब्रिटिशकालीन निरीक्षणन कुटी अंतिम श्वास घेत आहे. हा वारसा भुईसपाट होण्याच्या मार्गावर असून वन विभागाला अजूनपर्यंत जाग आली नाही. अतिशय जुनी देखणी वास्तू जतन करण्याची गरज आहे.
गोबरवाही जंगलव्याप्त परिसरात चिंचोली येथे वन विभागाची ब्रिटिशकालीन निरीक्षण कुटी आहे. ब्रिटिशांनी ती तयार केली होती. अतिशय देखणी अशी वास्तू सर्वांचे लक्ष वेधत आहे; परंतु मागील काही वर्षांपासून तिची पडझड सुरू आहे. काही दिवसांत ती भुईसपाट होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही; परंतु अजूनपर्यंत वन विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही. हा वारसा जतन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जंगलाचे रक्षण करण्याकरिता ब्रिटिशांनी हे निरीक्षण कुटी तयार केली होती. तुमसर तालुक्यात सुमारे ४५ किलोमीटर अंतरात जंगल आहे. या जंगलावर या निरीक्षण कुटीतून देखरेख व नियंत्रण ब्रिटिश अधिकारी करीत होते. काही इंग्रज अधिकारी येथे वास्तव्याला होते. स्वातंत्र्यानंतर केंद्र व राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका येथे होत होत्या. हा वारसा जतन करण्याच्या विसर वन विभागाला येथे पडला आहे. सध्या नाका डोंगरी वनपरिक्षेत्रामध्ये चिंचोली हा परिसर येतो.
चिंचोली येथे वन विभागाचे आऊट पोस्ट आहे. येथे कर्मचारी कर्तव्य बजावतात. त्यामुळे या कुटीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. वन विभागांतर्गत अनेक कामे करण्यात येतात. नवीन कामांना प्राधान्य देण्यात येते; परंतु जुन्या इमारतीचा इथे विसर पडलेला आहे. लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.