तुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) ते माडगी दरम्यान रस्त्यावरील जुन्या पुलाला जीवघेणे भगदाड पडले आहेत. प्रशासनाने पूल क्षतिग्रस्त असल्यामुळे सर्व वाहनांना बंदी असल्याचा फलक पुलाशेजारी लावला आहे. परंतु सर्रास या पुलावरून जड वाहनासह वाहतूक सुरु आहे. एखाद्या दिवशी मोठी प्राणहानी घडल्यावर प्रशासनाला जाग येणार काय, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. हा पूल जिल्ह परिषदेच्या अखत्यारीत येतो हे विशेष.तुमसर रोड (देव्हाडी) ते माडगी या तीन कि.मी.च्या रस्त्यावर देव्हाडी शिवारात हा पूल खूप जुना आहे. या मार्गावर युनिव्हर्सल फेरो कारखाना युनीडेअरीडेन कारखाना, माडगी, बाम्हणी ही गावे आहेत. पुलाखाली बाराही महिने पाणी वाहणे सुरुच असते. मागील तीन ते चार वर्षापासून पुलाला भगदाड पडले आहे. चुनखडी व दगडापासून हा पुल तयार झाला आहे. ब्रिटिशकालीन पूल असावा अशी माहिती आहे. चारचाही वाहने व इतर वाहने या पुलावरून दररोज ये जा करीत आहेत. या मार्गावर माडगी येथे शिरीनभाई नेत्रावाला ही सीबीएससी अभ्यासक्रमाची शाळा आहे. या शाळेच्या शालेय बस व तुमसर आगाराच्या शालेय बस दिवसातून दोन वेळा चार ते पाच बसेस या पुलावरून जातात. सर्वप्रथम लोकमतने एका वर्षापूर्वी वृत प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तेव्हा प्रशासनाने पुलाजवळ सावधान पुल क्षतिग्रस्त असल्यामुळे सर्व वाहनांना बंदी असा फलक लावला. परंतु वाहनांची वाहतूक सर्रास या पुलावरून सुरुच आहे. पावसाचे पाणी या पुलाखाली वर्षातून सहा ते आठ महिने साचले राहते. या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पुल खचण्याची भिती मोठी आहे .जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची या रस्त्यावर नियंत्रण व मालकी आहे.तीन वर्षापूर्वी या रस्त्यावर डामरीकरणाचे कामे करण्यात आली होती. हा पुल खचण्याच्या मार्गावर असल्याची निश्चितच माहिती या विभागाला आहे. परंतु अद्याप त्याचे नियोजन करण्यात आले नाही. अपघातानंतरच त्याचे नियोजन हा विभाग करणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो. रस्ता बांधकामापेक्षा या पुलाचे बांधकाम करणे आवश्यक होते. हा रस्त्याच बंद करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
ब्रिटिशकालीन पूल ठरतोय जीवघेणा
By admin | Updated: October 28, 2014 22:52 IST