शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष : जेसीस इंग्लिश सेकंडरी शाळेतील घटना भंडारा : शहरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेत हात तुटला. शाळा प्रशासनाने थातूरमातूर औषधोपचार करून घरी पाठविले. हात तुटल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. या अपघाताकडे शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पवनलाल नागपुरे यांनी केला आहे.शहरातील रामायणनगरी येथील सुधांशू पवनलाल नागपुरे हा जेसीस इंग्लीश सेकंडरी स्कुलमध्ये दहावी (ब) मध्ये शिकत आहे. गुरुवारला दीड वाजताच्या दीर्घ विश्रांतीत तो विद्यार्थ्यांसह शाळेच्या पटांगणात खेळत असताना एका विद्यार्थ्याने ढकलल्यामुळे त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी त्याला डॉ. देशकर यांच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर कुटुंबियांना गंभीर दुखापत नसल्याचे सांगून परत गेले. दरम्यान त्याच्या हाताचे हाड मोडल्याने दुखापत वाढली होती. यामुळे पालकांनी सुधांशूला त्याच खासगी रुग्णालयात नेले असता हाड मोडल्याचे निष्पन्न झाले. यामुळे शुक्रवारला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शालेय वेळेत हा प्रसंग घडल्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने याचे गांभीर्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सुधांशू हा डावखुरा असून त्याच हाताचे हाड मोडल्याने मार्च महिन्यात होऊ घातलेल्या दहावीच्या परीक्षेत पेपर सोडविताना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे शाळा व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने सुधांशूच्या पालकांसोबत इतरही पालकांमध्ये असंतोष आहे. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्याचा हात तुटला
By admin | Updated: December 15, 2015 00:38 IST