महाचर्चेतील सूर : भंडारा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रंगली महाचर्चाभंडारा : देशाला स्वातंत्र मिळण्यात तत्कालीन साहित्याचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात साहित्याने आपल्याला रोटी, कपडा आणि मकान मिळवून देण्यात महत्वाची भूमिकाच बजावली नाही तर आपले आचार, विचार शुद्ध करून आपले सारे जीवनच समृद्ध केले असा सूर ग्रंथाने मला काय दिले? या महाचर्चेतून आज व्यक्त झाला.गांधी विद्यालयात आयोजित भंडारा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ही महाचर्चा रंगली. यामध्ये चंद्रपूरचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोंडेकर, गडचिरोलीचे जगदिश म्हस्के, नागपुरचे डॉ.राम पाटील, प्रा.नरेश आंबीलकर, भाऊसाहेब पात्रे यांनी सहभाग घेतला.यावेळी बोंडेकर म्हणाले, ग्रंथ हे गुरुस्थानी आहेत. विज्ञानशक्ती, आत्मज्ञानशक्ती आणि साहित्यशक्ती या तीन शक्तींनी जगाला दिशा देण्याचे काम केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याने सूर्य अस्त न पावणाऱ्या इंग्रजी सत्तेला धक्का देण्याचे काम केले. तर संत गाडगेबाबांच्या साहित्याने गावे स्वच्छ करण्याची चळवळ रूजवली. जगदीश म्हस्के यांनी ग्रंथातून जीवनाला दिशा मिळते. विचारांची बैठक पक्की होते असे सांगितले. मात्र कोणताही साहित्य वाचताना माकडासारखा अंधानुकरण करू नका असा आग्रह त्यांनी केला. डॉ.राम पाटील म्हणाले, मूलभूत व शुद्ध धर्मग्रंथ, ध्यान ग्रंथ व ललीत साहित्याचा अभ्यास कमी झाल्यामुळे वाईट चालिरीती, रुढी, परंपरा रुढ झाल्यात. त्या घालवायाच्या असतील तर मुळ ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. आज इंटरनेटकडे माहितीचे महाजाल म्हणून पाहिले जाते. मात्र यामध्ये असलेली सर्व माहिती ही खरी व शुद्ध स्वरुपातीलच मिळेल याची खात्री देता येत नाही. प्रत्येकाने एकमेकांना ग्रंथ भेट म्हणून दिलेत तर ग्रंथोत्तेजक चळवळ पुढे जाऊ शकते. असे मत व्यक्त केले. नरेश आंबीलकर यांनी कानोसा, कहाणी मानव, प्राण्यांची प्रश्न आणि प्रश्न, कार्यरत, आनंदी शरीर आणि आनंदी मन, नग्न सत्य, मेंदूलता माणूस, महाभारतातील स्त्रियांचे सत्य, आपण माणसात जमा नाही, वात्रटीका, वाचणाऱ्याची रोजनिशी अशा पुस्तकांच्या वाचनातून माझे जीवन समृद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. संचालन अमोल बोंद्रे तर आभार शीतल ठोम्बरे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
ग्रंथाने मानवाचे जीवन समृद्ध केले
By admin | Updated: February 15, 2016 00:15 IST