भंडारा : मुंबई ते कोलकाता या महामार्गावर वसलेल्या राजकीयदृष्टया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून रेल्वेचे जाळे आहे. मात्र भंडारा शहरवासीयांना रेल्वेसाठी १० किलोमीटर अंतरावरील वरठी येथे जावे लागते. त्यामुळे भंडारा शहरातून रेल्वे व मेट्रो सुरू करावी, या मागणीसाठी भंडारा शहरवासीयांनी आता एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी केले आहे.
औद्योगिकदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या भंडारा शहराचे देशात नाव आहे. अशा या ऐतिहासिक भंडारा शहरातील व्यावसायिक असो किंवा कौटुंबिक व्यवस्थेसाठी येथील नागरिकांना रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास १० किलोमीटर अंतरावरील वरठी, तुमसर किंवा नागपूर येथून प्रवास करावा लागतो. रात्री-बेरात्री रेल्वे पकडण्यासाठी जावे लागत असल्याने वेळप्रसंगी अपघातही घडले आहेत.
हे सर्व टाळण्यासाठी भंडारा शहरात रेल्वेचे जाळे व जागा उपलब्ध असताना, स्थानिक प्रशासन तथा रेल्वे प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे भंडारा शहरात रेल्वेस्थानक उभारण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होत आहे.
आता रेल्वे मार्गावरच मेट्रोही धावणार आहे. त्यामुळे भंडारा शहरवासीय रेल्वे मेट्रोलाही मुकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंडारा शहराचे औद्योगिक, शैक्षणिक, कृषीविषयक कामकाज सुलभतेने व्हावे, जिल्हा स्थान असलेल्या भंडारा शहरातून रेल्वेसह मेट्रो सुरू करावी, यासाठी आता जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. रेल्वेसाठी भंडारा शहरवासीयांनी सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे कळकळीचे आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते यांनी केले आहे.
यानिमित्त मंगळवार, दि. २० जुलैरोजी दुपारी २ वाजता विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.