शिक्षक पतसंस्थेची निवडणूक : अविश्वास ठरावानंतर फेरबदललोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजीव बावनकर यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया आज मंगळवारला शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली. जिल्हा परिषद शिक्षकांच्या पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष विकास गायधने व उपाध्यक्ष राजन सव्वालाखे यांच्या विरोधात ११ संचालकांनी अविश्वास ठराव पारित केला होता. अविश्वास ठरावादरम्यान शिक्षकांच्या दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण पोहचले होते. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरुवातीला अध्यक्ष पदाची निवडणूक घोषित केली. दरम्यान या प्रक्रियेला विकास गायधने यांनी न्यायालयात दाद मागून आवाहन दिले होते. मात्र न्यायालयाने २२ तारखेपर्यंत त्यांना तात्पुरती स्थगीती दिली होती. मात्र २२ तारखेला त्यांच्या याचिकेवर सुनावणी देताना ती रद्दबातल केली. यामुळे पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक दिलेल्या तारखेनुसार आज मंगळवारला पार पडली. दरम्यान उपाध्यक्ष राजन सव्वालाखे यांच्यावरही ११ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करून तो पारीत केला. उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे व वरिष्ठ लिपीक बबिता साखरकर यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडली. ही निवडणूक शिक्षक नेते रमेश सिंगनजुडे व दिलीप बावनकर यांच्या नेतृत्वात पार पडली. अध्यक्षपदासाठी संजीव बावनकर यांचे एकमेव नामांकन असल्याने ते एकमताने अध्यक्ष पदावर विराजमान झाले. या प्रक्रियेत शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक रमेश सिंगनजुडे, शंकर नखाते, अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, शिलकुमार वैद्य, प्रकाश चाचेरे, रमेश काटेखाये, राकेश चिचामे, यामिनी गिऱ्हेपुंजे, विजया कोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
अध्यक्षपदी बावनकर अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:40 IST