नदीपात्रात ५० ते १०० मीटर लांब खड्डे : नदीपात्रातून रेती गायब, सर्वत्र मातीच मातीतुमसर : तुमसर तालुक्यातील बाम्हणी रेती घाटावरून बेसुमार रेती उपसा मागील काही वर्षापासून सातत्याने सुरू आहे. येथील विस्तीर्ण नदी पात्रात मोठ्या खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. ५० ते १०० मीटर लांब येथे खड्डे आहेत. नदीपात्रात सर्वत्र रेती ऐवजी माती दिसत आहे. पर्यावरणाला येथे धोका निर्माण झाला आहे. खनिकर्म व महसूल विभागाचे ढीगभर अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावरून वैनगंगा नदी वाहते. बाम्हणी रेतीघाट मोठा व प्रसिद्ध रेतीघाट आहे. नदी पात्र येथे विस्तीर्ण आहे. मागील सहा ते सात वर्षात रेतीघाटाचा सातत्याने लिलाव होत आहे. बेसुमार रेती उपसा केल्याने या रेतीघाटाची वाट लागली आहे. नदी पात्रात सध्या रेतीच नाही तर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे दिसत आहेत. नदी पात्रात रेती ऐवजी माती व मातीचे ढिगारे दिसतात.नदीपात्रात ५० ते १०० मीटरचे खड्डे पडले आहेत. रेती उत्खननाचे नियम येथे धाब्यावर बसविण्यात आले आहेत. महसूल व खनिकर्म विभागाचे कडक नियम केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. बेसुमार रेती उपसा सुरू असतानी संबंधित दोन्ही विभाग कुठे गेले होते हा नेमका प्रश्न उपस्थित होतो. नदीतला तळ गाठेपर्यंत रेती उपसा करण्यात आला हे अत्यंत गंभीर आहे. पर्यावरणाला येथे धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण वाचविण्याकरिता परिषदा घेण्यात येतात, परंतु वास्तविक स्थिती मात्र उलट आहे. बाम्हणी येथील प्रकाराची उच्च स्तरीय चौकशी झाली तर संबंधितावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हेच एकमेव काम येथे प्रथमदर्शनी दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
बाह्मणी रेतीघाट कंत्राटदारांनी लावली रस्त्याची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:43 IST