चौथ्या आरोपीला अटक : अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपींना पोलीस कोठडीतुमसर : गणपती पाहायला जाणाऱ्या भाविकांचा टॅक्टर रस्त्यात अडवून ट्रॅक्टर चालक व त्याच्या मदतनिसाला बेदम मारहाण करून महिलाची छेड काढल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींविरूद्ध अॅट्रासिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही आदिवासी बांधवांनी गोबरवाही पोलीस ठाण्याावर हल्लाबोल केला. पवनारखारी येथील गणपतीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात सहा तरूणांनी ट्रॅक्टर वाटेत अडविले. काही न बोलता ट्रॅक्टरचालकास बेदम मारहाण केली. दरम्यान चालकाचा मदतनिस मदतीकरिता धावून जाताच त्यालाही मारहाण केले. यात ते बेशुध्द पडल्यानंतर ट्रॅक्टमधील २५ ते ३० महिलांची छेड काढली. त्यामुळे भयभित महिलांनी ट्रॅक्टर चालक व त्याच्या मदतनिसाला बेशुध्द अवस्थेत गोबरवाहीत आणले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊनही आरोपींविरुद्ध कारवाई न झाल्यामुळे नागरिक संतापले. तीन आरोपींना कालच अटक केली मात्र अॅट्रासिटी कायदाअंतर्गत त्याच्यावर गुन्हे नोंद न झाल्याने आज शुक्रवारला आदिवासी बांधवांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. पोलीसांनी आणखी एका आरोपीला अटक केल्याने आरोपीची संख्या आता चार झाली आहे. नौशाद पठाण (२५), पियुष पांडे (२२), जितू नेवारे (२५) रा. गोबरवाही, संदिप लोखंडे रा.शिवाजीनगर तुमसर असे अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध भादंवि ३४१, ३२४, ५०६ सहकलम ४/२५, अनुसूचित जाती जमाती कायदा ३, २ (आर) (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.यावेळी जिल्हा परिषद सभापती शुभांगी राहांगडाले, गोबरवाहीचे सरपंच कृष्णकांत बघेल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात दिलीप सोनवाने, शेखर कोतपल्लीवार, अशोक उईके, शरद खोब्रागडे, आनंद जायस्वाल, अनिल टेकाम, विलास मरस्कोल्हे, दर्शन वाधवानी, ईसराईल शेख, किशोर हुमणे, लक्ष्मीकांत सलामे सहभागी झाले होते. (तालुका / शहर प्रतिनिधी)
दुसऱ्या दिवशीही पोलीस ठाण्यावर हल्लाबोल
By admin | Updated: September 17, 2016 00:51 IST