लाखांदूर : तालुक्यातील अनेक महत्वाची विकास कामे प्रलंबित आहेत. जनसंपर्क दौऱ्यात जनतेनी ओपारा- चीचोली -धर्मापुरी येथील पूल बांधकामाची मागणी रेटुन धरली. अवघ्या पंधरा दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिन्ही पुलांच्या बांधकामाला मंजुरी मिळ्वुन घेतली. यासंदर्भात, विकास कामांना विशेष प्राधान्यक्रम देऊन जनतेला दिलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रीया आमदार बाळा काशिवार यांनी पत्रपरिषदेतून दिली.लाखांदूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. आ. काशिवार म्हणाले, विकासकामे शक्य तितक्या लवकर व मागणीनुसार केली जातील. लाखांदूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले प्रलंबित रस्ते, पुलाच्या बांधकामाला प्राधान्य देऊन अग्रक्रमाने बांधकाम करण्याच्या सपाटा सुरु केला आहे. अनेक वर्षापासून जनतेची मागणी असलेले लाखांदूर तालुक्यातील चुलबंध नदीवरील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामाला मंजुरी मिळवून दिली आहे. जुनी बोथली ते नवी बोथली तसेच भागडी ते चिचोली या दोन्ही पुलाच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. यावर प्रत्येकी १० कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती आमदार बाळा काशिवार यांनी दिली. लाखांदूर तालुका चुलबंध नदीमुळे दोन विभागात विभागला गेला आहे. त्यामुळे जवळपास २५ ते ३० गावांना तालुक्याच्या ठिकाणी यायला मोठा त्रास सहन करावा लागतो. जुनी बोथली हे पुरपिडीत गाव असल्याने त्यांना नवी बोथली येथे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र या गावकऱ्यांची शेती जुनी बोथली येथे असल्याने त्याना दररोज नदी पार करून शेती कामासाठी जावे लागत होते. पावसाळ्याच्या दिवसात याचा मोठा फटका येथील नागरिकांना बसायचा.अनेक वेळा ग्रामस्थांनी पुलाची मागणी केली. मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्याचप्रमाणे भागडी ते चिचोली या चुलबंध नदीवर पुलाची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. आमदार बाळा काशिवार यांनी पुढाकार घेऊन त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे खासदार नाना पटोले यांच्या सहकार्याने सतत पाठपुरावा केला. खासदार नाना पटोले यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुलाची आवश्यकता समजाऊन सांगितली. आमदार काशिवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने दोन्ही पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. शासनाचे पत्रानुसार भागडी ते चिचोली या चुलबंध नदीवर १९० मीटर अंतराचे मोठे पूल बांधकाम खर्च १० कोटी रुपये तसेच ८ मार्च च्या पत्रानुसार जुनी बोथली ते नवी बोथली या मार्गावरील चुलबंध नदीवर १९० मीटर अंतराचे १० कोटी रुपयाचे मोठे पूल बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती आमदार बाळा काशिवार यांनी दिली. चुलबंध नदीवरील महत्वाचे दोन पुलाच्या बांधकाम होऊन जनतेला मोठा लाभ मिळणार आहे. यावेळी आ. बाळा काशिवार, वामन बेदरे, भाजप तालुकाध्यक्ष नूतन कांबळे, राधेश्याम, नगरपंचायत उपाध्यक्ष नरेश खरकाटे, नगरसेवक विनोद ठाकरे, हरीश बगमारे, भारत मेहेंदळे, गोपाल परशुरामकर, न. प. सदस्य प्रल्हाद देशमुख, रमेश मेहेंदळे, गोवर्धन गहाणे, लाला करंजेकर, ओमप्रकाश करंजेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
चुलबंध नदीवरील पुलांच्या बांधकामाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:31 IST