शासन नमले : वाढीव मानधनाची मागणी मंजूर लाखनी : राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्यामुळे मुक आंदोलन मागे घेण्यात आले.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेच्याद्वारे राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन कपात करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुक आंदोलनाचे आयोजन केले होते. शासनाला कोणताच अहवाल सादर न करता फक्त अंगवाडीत मुलांना अनौपचारिक शिक्षण देणे व आहार वाटप करणे सुरू होते. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे चार महिन्यापासूनचे मानधन थकित होते. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्यामुळे मुक आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळात १ एप्रिल २०१४ पासून राज्य शासनाने अंगणवाडी सेविकेला ९५० रूपये व मदतनिसांना ५०० रूपये मिनी अंगणवाडी सेविकांना ५०० रूपये याप्रमाणे वाढ दिली होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेली वाढ कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन, मोर्चे, मुक आंदोलन करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानधनाचा प्रश्न शासनदरबारी मांडला. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजुर केल्यामुळे दि. २९ जुलैला आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष सविता लुटे, उपाध्यक्ष मंगला गजभिये, अलका बोरकर, रिता लोखंडे, मंगला रंगारी, गौतमी मंडपे, आशा रंगारी, ललिता बडोले, बबिता मेश्राम, रेखा टेंभुर्णे, सुनंदा चौधरी, मीरा चकोले, अनिता चोले, सीमा खंडेलवार यांनी केले होते. (तालुका प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले मूक आंदोलन
By admin | Updated: July 30, 2015 00:43 IST