भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याने एसटी महामंडळाने भंडारा औरंगाबाद, तुमसर अमरावती बस फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भंडारा ते मुंबई अशी बस यापूर्वीही कधी सुरू नव्हती. मात्र भंडारा ते अकोला, अमरावती, शेगाव, औरंगाबाद, नांदेड, पुसद अशा विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक बसफेऱ्यांची संख्या घटल्या असल्याची माहिती आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चालला असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे विचार केल्यास खासगी वाहनांकडून होणारी अतोनात लुटीचा विचार केल्यास एसटी महामंडळाच्या बसेस सुरू असल्याने प्रवाशांना आजही दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात आज ३८० बसेस दररोज जिल्हा बाहेरून ये-जा करतात तर यासोबतच चाळीस बसेस रात्री मुक्कामी राहात आहेत. यासोबतच जिल्हा मुख्यालयावरून आजही अनेक बसेस सुरू आहेत. मात्र याचे प्रमाण आता घटले आहे. भंडारा नागपूर मार्गावर शिवशाही बसेस धावत असून अनेकांना ही शिवशाही आधार ठरत आहे. नागपूर-अमरावती अशा मोठमोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्ह्याबाहेरून एसटीने जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्याही घटली असल्याचे दिसून येत आहे. भंडारातून आजही अनेक बस दररोज ये-जा करीत आहेत.
बॉक्स
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चालल्याने जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्याही घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यातून दररोज ४० ते ४५ हजार दररोज प्रवासी प्रवास करत होते. मात्र हीच संख्या आता वीस हजारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न घटत आहे.
बॉक्स
मुंबई, पुणे, औरंगाबादसाठी वेटिंग नाही
भंडारा जिल्हा मुख्यालयावरून यापूर्वी अनेक प्रवासी औरंगाबाद, पुणे, अमरावती, नांदेडसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करत होते. मात्र कोरोनानंतर आता कोणत्याच मार्गावर बुकिंग होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेस मात्र रिकाम्या फिरत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
रातराणीच्या २२ बसेस सुरू
भंडारा जिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यात जाणाऱ्या तसेच इतर जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात रातराणी असणाऱ्या मुक्कामी बसेस २२ ते २५ सध्या सुरू आहेत. त्यामुळे एकीकडे आपले उत्पन्न वाढले पाहिजे तर दुसरीकडे चालक वाहकांना कोरोना संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात ११० मुक्कामी बस सुरू आहेत.
बॉक्स
भंडारा आगार प्रमुखांचा रिस्पाॅन्स नाही
सध्या सुरू असलेल्या बसेस व चालक, वाहकांबाबत माहिती विचारण्यासाठी संपर्क केला. मात्र त्यांनी कोणताही रिस्पाॅन्स दिला नसल्याने भंडारा मुख्यालयातून सध्या लांब पल्ल्याच्या किती बसेस सुरू आहेत याची माहिती मिळू शकली नाही. भंडारा आगार हे जिल्हा मुख्यालय असल्याने भंडारा आगारातून ग्रामीण भागासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसेस सुरू असाव्या, अशी प्रवाशांची मागणी आहे.