भंडारा : जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाची आज शनिवारला झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुनील फुंडे, कैलास नशिने, रामदयाल पारधी गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. संघाच्या अध्यक्षपदी धनराज श्रीपद चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी दिलीप रामलाल लांजेवार यांची निवड करण्यात आली. ८ नोव्हेंबरला झालेल्या या निवडणुकीत सहकार पॅनेलचे १५ पैकी ११ उमेदवार विजयी झाले होते. विरोधी पक्षाचे चार उमेदवार विजयी ठरले होते. या निवडणुकीत सहकार पॅनलचे नेतृत्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, संचालक कैलास नशिने, रामदयाल पारधी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली होती. आज झालेल्या निवडणुकीत धनराज चौधरी यांचेविरूद्ध विरोधी गटाकडून जगदीशप्रसाद अग्रवाल यांनी अर्ज सादर केला होता. धनराज चौधरी यांना ११ तर अग्रवाल यांना ४ मते मिळाली. उपाध्यक्षपदाकरिता दिलीप लांजेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरूद्ध नितीन कडव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धनराज चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संचालक म्हणून महेश कहालकर, नरेश दिवठे, बोधनकर, अण्णा टिचकुले, निलवंष्ठठ मोरे, मयुरध्वज गौतम, वासुदेव मेश्राम, कुसुम कांबळे, सुशिला पारधी यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी रामदयाल पारधी, कैलास नशिने, प्रमोद गभणे, अनिल पंचबुध्दे, रुबी चढ्ढा, धनराज सार्वे, नरेंद्र बुरडे, सत्यवान हुकरे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
कृषी औद्योगिक संघावर फुंडे, नशिने गटाचे वर्चस्व
By admin | Updated: December 6, 2015 00:34 IST