भंडारा : एकीकडे वृद्ध किंवा जेष्ठांना न्याय व सन्मान देण्याची घोषणा होत असली तरी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून वृद्धांची फरफट होत आहे. आजही निराधार योजनेतील गरजुंना तुटपुंज्या मानधनासाठी कार्यालये तथा बँकाचे उंबरठे झिझवावे लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी तहसील कार्यालयात बघावयास मिळाला. भंडारा तालुक्यातील कवडशी येथील इंदिराबाई घोल्लर या वूद्ध महिलेला संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. जवळपास वयाची सत्तरी गाठलेल्या इंदराबाईने प्रथम बँकेत जाऊन विचारपूस केली. यात फेब्रुवारी व मार्च महिन्याचे मानधन त्यांच्या खात्यात जमा न झाल्याचे सांगण्यात आले. तसेच भंडारा तहसील कार्यालयात जाऊन विचारपूस करण्यात सांगितले. रणरणत्या उन्हात या वृद्ध महिलेने तहसील कार्यालय गाठले. मात्र ‘शासकीय काम तासभर थांब’ या उक्तीचा या आजीबाईलाही प्रत्यय आला. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात मानधन जमा करण्यात येईल, वाट पाहा, असे इंदिराबाईना सांगण्यात आले. आुयष्याच्या संध्याकाळी ६०० रूपयांच्या तुटपुंज्या मानधनात आरोग्याची काळजी घ्यावी की उदरनिर्वाह करावा अशी चिंता या वृद्धेच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती. मानवी संवेदना हरपत चाललेल्या या जगात कदाचित ही बाब क्वचितांनाच दिसावी. (प्रतिनिधी)
निराधार योजनेपासून वृद्ध वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:25 IST