मार्च महिन्यात ७,०१४ वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:51+5:302021-04-18T04:34:51+5:30

भंडारा: जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने, तसेच सामान्य जनतेने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ...

Action taken against 7,014 vehicle owners in March | मार्च महिन्यात ७,०१४ वाहनधारकांवर कारवाई

मार्च महिन्यात ७,०१४ वाहनधारकांवर कारवाई

Next

भंडारा: जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने, तसेच सामान्य जनतेने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिसांनी ७,०१४ वाहनधारकांवर कारवाई करीत, मार्च महिन्यात तब्बल २२ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यासोबतच १०० जणांचे लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव तयार करून उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाकडे (आरटीओ) पाठविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकावर कायदेशीर मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येत आहे.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस विभागाने केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लोकेश काणसे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तासह वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याने, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झाले आहे. वाहतूक शाखेकडून वाढत्या कोरोना संसर्गाच्या काळात सामान्य जनतेने वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी विशेष मोहिमेवर भर दिला आहे. यासाठी पोलिसांकडून नागरिकांना समज देण्यात येत आहे. यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तब्बल २२ लाखांचा दंड आकारल्याने आता वाहतुकीला शिस्त लागणार आहे. अनेक विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केल्याने, आता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची संख्याही कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक जण अनेकदा विविध कारणे सांगून वाहन चालकांकडून सरस नियमाची पायमल्ली करण्याचे प्रकार दिसून येतात. त्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिमेवर भर दिला आहे. यामध्ये दुचाकीवरून ट्रिपलसीट फिरणाऱ्या २७ जणांवर ५,४०० रुपयांचा दंड, हेल्मेट न लावलेल्या ५३९, सीटबेल्ट नसणाऱ्या ७८० जणांवर, ओव्हरस्पीड वाहन चालविणाऱ्या ५५९ जणांवर तर मोबाइलवर बोलणाऱ्या ३५ तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८ जणांवर असे एकूण एक हजार ७२१ व इतर ५ हजार २९३ अशा एकूण ७ हजार ०१४ जणांवर २२ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा दंड पोलिसांनी केला. जिल्ह्यातील सामान्य जनतेने वाहन वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा करणे सुरू केले आहे.

बॉक्स

दोन दिवसांत एक लाख २३ हजारांचा दंड

जिल्हा प्रशासनाने वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त केला होता. मात्र, अशाही परिस्थितीत काही जण विनाकारण वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावरून फिरताना आढळून आले होते. अशांना पोलिसांकडून समज देत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४९४ जणांवर कारवाई करून एक लाख २३ हजारांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे आता मोबाइलवर बोलणे महागात पडत असल्याचे दुचाकीधारकांच्या लक्षात आल्याने, अनेक जण आता वाहन चालवताना मोबाइलवर न बोलण्याची जणूकाही धास्तीच घेतली आहे.

बॉक्स

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या आता कमी दिसू लागली आहे. यासोबतच पोलिसांशी हुज्जतबाजी घालत विविध कारणे सांगणाऱ्या तरुणही आता पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या विशेष मोहिमेमुळे वाहतूक नियमांचे पालन करतांना दिसून येत आहेत. आता विनाकारण रस्त्यावरून फिरल्यास एकीकडे पोलिसांच्या रोष तर दुसरीकडे दंडाची पावती आकारण्यात येत असल्याने नियम मोडणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Web Title: Action taken against 7,014 vehicle owners in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.