शुभल वैद्यचा मृत्यूशी लढा : ९० टक्के भाजला भंडारा : येथील शास्त्रीनगरातील प्रगती कॉलनी रहिवासी तथा सध्या वीज कंपनी अमृतसर येथे कार्यरत असलेला २४ वर्षीय शुभल श्रीराम वैद्य याचा गुरुवारी (ता.२०) अपघात झाला. विद्युत जनित्राद्वारे झालेल्या या अपघातात शुभल ९० टक्के भाजला असून गेल्या तीन दिवसांपासून त्याचा मृत्यूशी लढा सुरु आहे.प्रगतीनगरातील रहिवासी तथा मन्रो शाळेतील सेवानिवृत शिक्षिका शशी श्रीराम वैद्य यांचा तो मुलगा होय. प्राथमिक शिक्षण महिला समाज येथून पूर्ण केल्यानंतर त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. मागील दोन वर्षापासून अमृतसर येथील थर्मल पावर प्लांट जी.बी.के. कंपनी येथे विद्युत अभियंता म्हणून कार्यरत होता. शुभल गुरुवारी कंपनीत कार्यरत होता. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान विद्युत जनित्रामध्ये आलेला बिघाड सहकाऱ्यांसोबत दुरुस्त करीत असताना अचानक लागलेल्या विद्युत धक्क्याने व स्फोटाने शुभल जवळपास ९० टक्के भाजला गेला. त्याला तातडीने अमृतसर मधील अमनदिप हॉस्पीटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र अधिक प्रमाणात भाजला आहे. परिणामी तो औषधोपचाराला साथ देत नसल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडाऱ्याच्या या तरुण अभियंत्याचा गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी कडवी झुंज सुरु आहे. ऐन उमेदीच्या काळात भंडारा शहरातील २४ वर्षीय तरुण अभियंता शुभलचा असा अपघात होणे मनाला चटका लावून गेला आहे. (नगर प्रतिनिधी)
भंडाऱ्यातील अभियंत्याचा अमृतसरमध्ये अपघात
By admin | Updated: October 24, 2016 00:37 IST