गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जंगलालगतच्या शेतशिवारात रानडुकराच्या मागे लागलेल्या वाघाचा आणि रानडुकराचाही शिहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तुमसर तालुक्यातील चिखला गावालगतच्या शेतशिवारात ही घटना घडली.
वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदल्या रात्री वाघ शिकारीसाठी रानडुकराच्या मागे लागला असावा. त्याचा पाठलाग सुरू असताना रानडुक्कर आणि वाघ हे दोघेही विहिरीत पडले असावे, असा अंदाज आहे. हे शेत चिखला येथील कवनलाल बाबुलाल धुर्वे यांच्या मालकीचे असून ते गट क्रमांक १२२ मध्ये आहे. या विहिरीला तोंडी नाही, हे विशेष !
सकाळी शेेतकरी आपल्या शेतात गेले असताना त्यांना वाघ आणि रानडुक्कर विहीरीत मृतावस्थेत तरंगत असलेले दिसले. त्यांनी वन विभागाला सूचना दिल्यावर गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे, राउंड अधिकारी अशोक मेश्राम यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन दोन्ही प्राण्यांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले. त्यांचे शवविच्छेदन चिचोली डेपो येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बारापात्रे, डॉ. पाटील, डॉ. तुलावी यांनी केले. त्यानंतर वाघ आणि डुकरावर चिचोली डेपो येथे उपवनसंरक्षक गवई, सहाय्यक उपवन संरक्षक रितेश भोंगाडे यांच्या उपस्थित अग्नीदाह करण्यात आला.
विनातोंडीच्या विहीरीमुळे अपघातवाघ आमि रानडुक्कर ज्या विहीरीत पडले त्याला तोंडी नव्हती. दगडाने बांधलेल्या या समतल विहीरीचा धावताना अंदाज न आल्याने एकापाठोपाठ ते दोघही विहीरीत पडले असावे, असा अंदाज आहे. विहीरीवर तोंडी न बांधणाऱ्या शेतकऱ्यावर वन विभाग कार कारवाई करणार, हे आता महत्वाचे आहे.