लाखांदूर व पवनी पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी : अवैधरीत्या दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणलेलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर/पवनी : एखाद्या सिनेमातील दृश्य पहावा असा चोर पोलिसांचा खेळ काळ रात्रभर रंगला, आणि दोन वाहनांसह चक्क पावणे आठ लाखांची देशी दारू पकडण्यात लाखांदूर व पवनी पोलिसांनी यश मिळाले. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.लाखांदूर तालुका हा दारूबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. दोन्ही जिल्ह्याला जाणारे मार्ग लाखांदूर मधूनच जातात त्यामुळे परजिल्ह्यातून येणारी दारू लाखांदूर मार्गे जात असल्याची गुप्त माहिती लाखांदूर पोलिसांना मिळाली. त्या आधारे लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. पुसाटे यांनी सापळा रचला. सकाळी ८ वाजता मासळ - ढोलसर मार्गावर अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी थांबविले मात्र पोलिसांना पाहताच गाडीचालकाने धूम ठोकली. अन चोर पोलिसांचा खेळ सुरू झाला. २ की. मी. पाठलाग केल्यानंतर अखेर चारचाकी वाहन पकडण्यात आले. वाहन क्रमांक एम. एच. ३१ सी. आर. ९५५७ यात कोंढा येथील किरकोळ देशी दारू विक्री दुकानातील देशी दारूच्या पेट्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी १४ देशी दारूच्या पेट्या व मुद्देमालासह असा एकूण १ लक्ष ३३ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. वाहनचालक नरेश शंकर गभने (३५) रा. धामणी (ता. पवनी) याला अटक करुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५ अ ८२, ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.यादरम्यान मासळ रस्त्यावर पुन्हा एक चारचाकी वाहन संशयित रित्या आढळल्याने त्या वाहााचा १५ की. मी. पाठलाग करून पवनी येथील मुख्य चौकात पवनी पोलिसांच्या मदतीने गाडी पकडण्यात आली. गाडी क्र. एम. एच. ३१ डी. सी. ५३७७ मध्ये ८० पेटी देशी दारूसह ६ लक्ष ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात वाहनचालक किरणकुमार गौडशेलवार व श्रीनिवास कोल्लावार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कार्यवाही पवनी पोलीस करीत आहेत. अशा प्रकारे लाखांदूर व पवनी पोलिसांनी एकूण पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक बी. आर. पुसाटे, पोलीस नायक अमितेश वाडेंटवार, राजेश पंचबुद्धे, लोकेश ढोक, किशोर फुंडे, सचिन कापगते, धनराज ठवरे व पवनी पोलिसांच्या चमूने सहभाग नोंदविला.
पाठलाग करून आठ लाखांची देशी दारू जप्त
By admin | Updated: May 10, 2017 00:24 IST