युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाकडून गोरगरिबांसाठी शिवभोजन योजना राबविली जात आहे. दुपारी ११ ते २ या वेळेत गरजूंना माध्यान्ह भोजन थाळी केवळ १० रुपयांत दिली जाते. त्यामुळे गोरगरिबांची एकवेळच्या स्वस्त जेवणाची गरज भागत आहे. परंतु, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी आदी तीन महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे शासकीय अनुदान अद्यापही रखडले आहे. त्यामुळे दररोज हजारो गरिबांचे पोट कसे भरावे, असा प्रश्न उभा ठाकल्याने शिवभोजन केंद्र चालकांत नाराजीचे वातावरण आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन योजनेला सुरुवात झाली. त्यानंतरच्या महायुती सरकारनेसुद्धा ही योजना सुरू ठेवली. त्यामुळे गरिबांना दुपारच्या जेवणाची सोय झाली. लॉकडाउन काळापासून या योजनेने अनेकांना आधार दिला, भंडारा जिल्ह्यात सध्या ६० शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. पहिल्या येणाऱ्या लाभार्थ्याला प्राधान्य या तत्त्वानुसार दुपारी ११ ते २ या वेळेत शिवभोजन दिले जाते. त्यामध्ये वरण, भात, भाजी आणि दोन चपात्या यांचा समावेश आहे.
प्रत्येक थाळीमागे असे मिळते अनुदान
- शहरांसाठी एका थाळीमागे शासन ४० रुपये अनुदान देते. १० रुपये लाभार्थ्यांकडून घेतले जातात. ग्रामीण भागासाठी ३५ रुपये शासन, तर १० रुपये लाभार्थी देतात. अनुदानातून शिवभोजन केंद्र चालविले जातात.
- शिवभोजन केंद्रात लाभार्थ्यांना २ वरण-भात, भाजी आणि दोन चपात्या दिल्या जातात. १० रुपयांत पोटभर जेवण देण्याची सोय शिवभोजन केंद्रातून होत आहे.
३ तास सुरू राहते गोरगरिबांसाठी शिवभोजन केंद्रगरजु लोकांना मध्यान्ह भोजनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केले. दुपारी ११ वाजतापासून सुरू होणारे केंद्र २ वाजतापर्यंत सुरू राहते. गोरगरीबांना पोटभर भोजनाची सुविधा या माध्यमातून उपलब्ध होते.
दररोज बदलतो मेनूशिवभोजन केंद्रात गरजुंसाठी अन्न शिजविले जात असले तरी दररोजचा मेनू बदलता ठेवला जातो. हंगामानुसार मेनूमध्ये विविध पदार्थाचा समावेश केंद्र संचालकांकडून केला जातो. सण, उत्सवात गोड पदार्थही दिले जातात.
महागाईमुळे ५० रुपयांतही थाळी परवडेनाशहरांसाठी एका थाळीमागे शासन ४० रुपये अनुदान देते. १० रुपये लाभार्थ्यांकडून घेतले जातात, असे ५० रुपये केंद्र चालकांना मिळतात. या अनुदानातून अनुदानातून शिवभोजन शिवभोज केंद्र चालविले जातात. शिवभोजन केंद्रांवरून १० रुपयांत लोकांना हे भोजन मिळते.
दररोज गोरगरीब व गरजूंच्या जेवणाची सोयभंडारा जिल्ह्यात दररोज अंदाजे ४००० जणांच्या एकवेळ जेवणाची सोय शिवभोजन केंद्रातून होते. यात ऑटो व रिक्षाचालक, मजूर, विद्यार्थी, खासगीत काम करणाऱ्यांचा समावेश आहे. नियमित शिवभोजन केंद्रांमुळे अनेकांना आधार मिळत आहे.
"जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांचे शासकीय अनुदान प्राप्त झालेले नाही. शासनाने तातडीने अनुदान द्यावा, केंद्र चालकांची होरपळ थांबवावी."- सुनीता चवळे, केंद्रचालक, भंडारा.
"जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांचे शासकीय अनुदान प्राप्त झालेले नाही. शासनाने तातडीने अनुदान द्यावा, केंद्र चालकांची होरपळ थांबवावी."- अमित मेश्राम, केंद्रचालक, तुमसर.