जिल्हा परिषद शाळांचा उपक्रम : सुकळी येथे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर होणार कार्यशाळामोहन भोयर तुमसरप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला आहे. देव्हाडी बीटातील सुकळी येथे शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात येत असल्याने शैक्षणिक साहित्य अपडेट करण्यात शिक्षकांची धावपळ सुरू आहे. कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या ४१ शाळा नववधू सारख्या सजविण्यात आल्या आहे.तुमसर तालुक्यातील देव्हाडी केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेच्या ४१ शाळेतील विद्यार्थी शंभर टक्के प्रगत करण्याकरिता कुवठे पॅटर्न या शाळांत राबविल्या जात आहे. यात ज्ञानरचनावादी साहित्य तयार करुन विद्यार्थ्यांपुढे सादर केल्या जात आहे. देव्हाडी बीटची प्रायोगीक तत्वावर विद्यार्थी व शाळा प्रगत करण्याकरिता निवड करण्यात आली.विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली असून जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के प्रगत करण्याकरिता सांगलीतील कवठे बीट पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. सुकळी (दे) येथे शैक्षणिक गुणवत्ता वाढ जिल्हा कार्यशाळा १२ जानेवारी रोजी आयोजित केली असून यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह जिल्ह्यातील ६५ अधिकारी व शेकडो शिक्षक सहभागी होत आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा सांगली व वाशिम येथे पार पडली. येथे शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे सादरीकरण तथा चर्चासत्र आयोजित करण्यात आले. जिल्हास्तरीय कार्यशाळेत तालुकानिहाय शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी प्राथमिक हे शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या प्रयत्नाचे सादरीकरण पीपीटीद्वारे करणार आहे. तुमसर तालुक्यातील प्रत्येक शाळेतून एक शिक्षक या प्रमाणे ६५ अधिकारी व शिक्षकांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यशाळेला राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार बिसन, संचालक शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, शिक्षणाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. गटशिक्षणाधिकारी सी. के. नंदनवार व श्क्षिण विस्तार अधिकारी विजय आदमने कार्यशाळेसाठी प्रयत्नशील आहेत.सर्वांचीच उपस्थितीकार्यशाळेला शिक्षक प्रवर्गात तुमसर, मोहाडी, लाखनी, पवनी, मुख्याध्यापक प्रवर्गात तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, केंद्रप्रमुख गटात भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, विस्तार अधिकारी गटात तुमसर, मोहाडी, लाखनी, पवनी व गटशिक्षणाधिकारी गटात तुमसर, लाखांदूर, लाखनी व भंडारा हे सादरीकरण करणार आहे.
नववधूसारख्या सजल्या ‘त्या’ ४१ शाळा
By admin | Updated: January 11, 2016 00:33 IST