राजू बांते
मोहाडी : भंडारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. भीतीचे वातावरण बनले आहे. अशा स्थितीतही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आज इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती पार पडली. या परीक्षेत जिल्ह्यातील २ हजार ८३४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी विदर्भातून सर्वात अधिक २ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच एनएमएमएस परीक्षेसाठी नोंदणी करण्यात राज्यात भंडारा जिल्हा आठव्या स्थानावर आहे. आज होणाऱ्या आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा कशा होतात, याकडे पालकांचे लक्ष लागून होते.
कोरोनाची धास्ती अन् दुसरीकडे आठवीची एनएमएमएस परीक्षा कशी होणार, याविषयी प्रशासन, विद्यार्थी व पालक यांना चिंता होती. तथापि, शिक्षण विभागाने अतिशय कुशलतेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे व्यवस्थापन केले होते.
भंडारा जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रांवर २ हजार ९२४ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९० विद्यार्थी या परीक्षेत गैरहजर होते. विद्यार्थी अनुपस्थितीची संख्या भंडारा व तुमसर तालुक्यात दिसून आली.
परीक्षा केंद्रावर आपल्या मुलांना परीक्षा देण्यासाठी स्वतःच्या वाहनांनी आले होते. मुलांचे धाडस वाढावे यासाठी शिक्षकांनी परीक्षा केंद्रावर भेटी घेतल्याचे चित्र दिसून आले.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. तसेच हात निर्जंतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रप्रमुखांनी परीक्षा संदर्भात सूचना दिल्या. सकाळच्या १०.३० वाजताच्या पेपरला ९ वाजतापासून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येणे सुरू झाले होते. शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
कोट बॉक्स
कोविड-१९ बाबत शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. विद्यार्थी तणावमुक्त परीक्षा देत होते. विद्यार्थी परीक्षा देण्यास आसुसले होते.
संजय डोर्लिकर,
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा
परीक्षा कधी होते याची प्रतीक्षा करीत होती. परीक्षा केंद्रावर तणावमुक्त वातावरण होते. ही शिष्यवृत्ती परीक्षा आयुष्य घडविणारी आहे.
रोशनी डोकरीमारे,
विद्यार्थिनी, मोहगाव देवी
विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सदर परीक्षेच्या पेपरचा सराव करून घेतला. त्यामुळे शाळेतील मुले तयार झाली होती.
पंकज बोरकर,
शिक्षक