तहसीलदारांची कारवाई : पोलीस मुख्यालयात वाहने जमाभंडारा : जिल्ह्यातील विविध रेतीघाटातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या २० ट्रक आणि एक ट्रॅक्टरसह अशी २१ वाहने मंगळवारला जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संयुक्त पथकाने केली. जप्त करण्यात ट्रकांमधून सुमारे शंभर ब्रास रेती नागपूरकडे वाहून नेणे सुरू होते. भंडारा परिसरातील रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती सोमवारला रात्री महसुल विभागाला मिळाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी आणि तहसीलदार सुशांत बनसोड यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने कारवाई सुरू केली. दरम्यान सोमवारला तीन ट्रक आणि एक ट्रॅक्टरला पकडण्यात आले. मंगळवारला ही मोहीम तीव्र करण्यात आली. त्यात १७ ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेत असल्यामुळे कारवाई करण्यात आली. माहितीनुसार, प्रत्येक ट्रकमध्ये चार ते पाच ब्रास रेती दिसून आली. बहुतांश ट्रक टीपीविना आणि क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक करणारे आढळून आले. हे ट्रक भंडारा शहर, राष्ट्रीय महामार्गावरील बेला आणि शहापूरजवळ तैनात पथकांनी पकडले. सर्वच ट्रक चालकावर प्रति ब्रास १०,४०० रूपये याप्रमाणे दंड ठोठावण्यात आला. या रेतीची किंमत २.४० लाख असून दंडाची रक्कम १० इतकी आहे. आतापर्यंत चार ट्रक मालकांकडून १ लाख ३५,४०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. हे सर्व २१ ही ट्रक पोलीस मुख्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
रेतीची अवैध वाहतूक करणारे २१ ट्रक पकडले
By admin | Updated: July 27, 2016 00:49 IST