मदतीसाठी १५ प्रकरणे पात्र : साकोली तालुक्यात सर्वाधिक पाच तर भंडारा तालुक्यात एक आत्महत्याभंडारा : मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या तालुक्यातील २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक समस्याची तीव्रता आणखीच वाढत असल्याचे शेतकरी आत्महत्यांवरून जाणवत आहे. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना सोसावा लागत आहे. त्या परिस्थितीमुळे पुरेसे उत्पादन घेता येत नाही. त्यातही पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यावर अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो. दिवाळीनंतर बाजारातील तांदूळ व धानाचे भाव घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालाच्या विक्रीसाठी उशिर केला. पण काही केल्या बाजारातील तांदळाचे भाव वाढलेच नाही. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. जानेवारी महिन्यात एकुण १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील नऊ प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. फेब्रुवारी महिन्यात चार शेतकऱ्यांनी गळफास घेतला. ही सर्व चारही प्रकरणे मदतीस पात्र ठरली. मार्च महिन्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील दोन प्रकरणे मदतीस पात्र ठरली. अन्य दोन प्रकरणे चौकशीत आहेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तालुक्यांचा विचार केल्यास चालू वर्षात आतापर्यंत साकोली तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. लाखांदूर आणि पवनी तालुक्यात प्रत्येकी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुमसर व लाखनी तालुक्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांनी तर भंडारा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. (नगर प्रतिनिधी)निसर्गाच्या चक्रव्यूहात शेतकरीखरीप हंगामात पाठ दाखविणाऱ्या पावसाने रब्बीतही शेतकऱ्यांना गारद केले. मार्च महिन्यात दोनदा अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी कमालीचा संकटात सापडला. शेतातील रबी पीक आमराई व पालेभाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे नापिकीने शेतकरी पूर्णत: खचला असून त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. उन्हाळी धानपिकालाही पाणीटंचाई व भारनियमनाचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळच नसल्याचे शेतकऱ्यांच्या समस्यांवरून लक्षात येते. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
तीन महिन्यात २० शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Updated: April 14, 2016 00:35 IST