भंडारा : राज्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यातील १६९ ग्रामपंचायतीमध्ये एप्रिल महिन्यात निवडणुका होत आहेत. त्यापैकी १४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २१ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त पदासाठी पोटनिवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये जिल्हयातील दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषद आणि सात पंचायत समित्यांचाही निवडणुका होणार आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्रम जाहिर झाला आहे.भंडारा जिल्ह्यातील १६९ ग्रामपंचायतीमधील ४८४ प्रभागातील पुढील महिन्यात २२ एप्रिल रोजी मतदान घेतले जाईल. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या १४८ ग्रामपंचायतीच्या ४६९ प्रभागासाठी आणि पोटनिवडणूक होणाऱ्या २१ ग्रामपंचायतीमधील २३ प्रभागासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ३० मार्च रोजी अधिसूचना प्रसध्दि करुन ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येतील. ८ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार असून, १० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणुक चिन्हाचे वाटप केले जाणार असून, २२ एप्रिल रोजी मतदान आणि २३ एप्रिल रोजी मतमोजणी केली जाईल. दरम्यान अनुसूचित जाती , जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांवरुन निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासह जातीचे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. पंरतु विधिमंडळ सभागृहात हा विषय चर्चेला आल्यानंतर राज्य शासनाने सदर अट शिथिल केली आहे. परिणामी, मागास उमदेवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
१६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका
By admin | Updated: March 28, 2015 00:27 IST