संतोष जाधवर लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा विभागात आता एसटी बसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. भंडारा विभागातील सहा आगारात मिळून ९२ बसेसच्या १५८ फेऱ्या दररोज होत आहेत. भंडारा विभागाला दररोज १२ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. गत आठवड्यात भंडारा विभागाचे प्रति किलो मीटर उत्पन्नात संपूर्ण राज्यात भंडारा विभाग अव्वल होता. एसटीची सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आता कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणखी ५० कंत्राटी चालकांची नेमणूक होणार आहे. अजूनही अनेक एसटी कर्मचारी दुःखवट्यात सहभागी असल्याने आता महामंडळाने भंडारा विभागातील २०९ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये भंडारा आगारातील २२, साकोलीतील ५६, गोंदियातील २८, तुमसरातील ३५, तिरोडातील २५, पवनीत १९, विभागीय कार्यालयातील २, विभागीय कार्यशाळेतील १६, विभागीय भांडार शाखेतील ६ असे एकूण २०९ एसटी कर्मचारी आत्तापर्यंत बडतर्फ केले आहेत. यामध्ये ७७ चालक, ५१ वाहक तर ६ चालक कम वाहकांचा समावेश आहे. तर प्रशासकीय ३४ कर्मचारी तर यांत्रिकी विभागाचे ४१ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली असल्याची माहिती आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार- शासनाने कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर रूजू होण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही अनेक कर्मचारी आजही कामावर रूजू झालेले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. शिवाय निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार काय? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे.
दररोज १२ लाखांचे मिळते उत्पन्नभंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. या सहा आगार मिळून सध्या ९२ बसेस धावत आहेत. तर दररोजचे २२ हजार किलोमीटर अंतर कापले जात असून दररोज भंडारा विभागाला १२ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. गत काही महिन्यापासून एसटी कर्मचारी दुखवट्यामध्ये सहभागी झाल्याने एसटीची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मात्र आता एसटीने पर्याय शोधले आहेत.
दररोजचा २२ हजार किमीचा प्रवास..- भंडारा विभागात साकोली, तुमसर, भंडारा, पवनी, गोंदिया, तिरोडा असे ६ आगार आहेत. या सर्व सहाही आगारातून ९२ बसेसच्या १५८ बसफेऱ्या होत असून दररोज २२ हजार किलोमीटर बसेस फिरत आहेत. यामध्ये भंडारा आगारातील २२, गोंदियातील ८, साकोलीतील १३, तुमसरातील ९, तिरोडा तील ३, पवनी ९ अशा एकूण ९२ बसेस धावत आहेत.
५० कंत्राटी चालकांना पुन्हा मंजुरी - एसटी महामंडळाने वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी कंत्राटी चालकांची चाचणी घेऊन काही चालक कर्तव्यावर रुजू झालेत तर आणखी पुन्हा खाजगी कंपनीतर्फे ५० कंत्राटी चालकांची पदे भरण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. यापैकी १५ जणांची चाचणी घेतली असून उर्वरित कंत्राटी चालकांचीही चाचणी प्रक्रियाही लवकरच पूर्ण होऊन त्यांना रुजू केले जाणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक महेंद्र नेवारे यांनी दिली.
विभाग नियंत्रक काय म्हणतात ?
भंडारा विभागात एसटी बससेवा आता पूर्वपदावर आली आहे. येणाऱ्या काही दिवसात शालेय विद्यार्थ्यांनाकरीता मानवविकासच्या बसफेऱ्या विनावाहक सोडण्यात येतील. तसेच सहाही आगारातील विविध मार्गावर बस फेऱ्या वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. -महेंद्र नेवारे, विभाग नियंत्रक, भंडारा.