भंडारा : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ५६ केंद्रावर एकूण १४ हजार ८२२ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बैठे पथकांसह २० भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणाऱ्या कॉपी व अनुचित प्रकारावर करडीनजर ठेवणार आहेत. जिल्हा प्रशासन सज्जविभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किसन शेंडे म्हणाले, मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. २० भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकात शिक्षणाधिकारी, महसूल विभागाचे प्रमुख, संबंधित तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्यासह अन्य तीन सदस्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर बैठे पथकाची चमू स्थापित करण्यात आली आहे. यात तीन जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. (नगर प्रतिनिधी)
१४,८२२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By admin | Updated: February 20, 2015 00:25 IST