प्रशासनाची जय्यत तयारी : ‘माय प्लान्ट’ अॅपवर मागणी नोंदविण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार कोटी वृक्ष लागवडीचा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासनाव्यतिरिक्त नागरिक व संस्थांना वृक्ष लागवडीची माहिती वनविभागाच्या पोर्टलवर नोंद करता यावी, यासाठी ‘माय प्लान्ट’ मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. १ जुलै रोजी हा मोबाईल अॅप कार्यान्वित होणार आहे.१ जुलै ते ७ जुलै या कालावधीत सर्व जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवड करून ते रोपटे जिवंत ठेवण्याचा संकल्प शासनाने केला आहे. भंडारा जिल्ह्याला १,२२९ रोपवनस्थळी १३.७५ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. रोपे उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा व तालुकास्तरावर ‘रोपे आपल्या दारी’ या शासनाच्या योजनेअंतर्गत वनविभागाव्दारे ठिकठिकाणी सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध करून देण्याकरीता स्टॉल लावण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात हा संकल्प यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सूचनेनुसार नियोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात शासन यंत्रणेसह सर्वसामान्य नागरिक व सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. शासनाच्या विभागांना दिलेल्या उद्दिष्टानुसार करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीची नोंद वनविभागाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था व इतर संस्थांना वृक्ष लागवडीची नोंद करण्यासाठी शासनाने माय प्लॅन्ट मोबाईल अॅप तयार केला आहे. या अॅप्समध्ये वृक्ष लागवडीची माहिती कशाप्रकारे भरावयाची हे दिले आहे. यामध्ये वृक्ष लागवड करणाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे व गावाचे नाव, वृक्ष लागवडीचे स्थळ, किती जणांचा सहभाग आहे, किती रोपे लागवड केली, वृक्ष लागवडीचे छायाचित्र आदी माहिती अद्ययावत करता येणार आहे. या वनमहोत्सवात जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व वनविभागाने केले आहे.
१३.७५ लाख वृक्ष लागवड होणार
By admin | Updated: July 1, 2017 00:21 IST