लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली अधिक नफा कमावण्याचे आमिष दाखवून ३२३ जणांची ११ कोटी ४८ लाख ४०,०२१ रुपये उकळण्यात आले. फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात एका आरोपीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, तर दुसऱ्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या दोघांच्या जामिनावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांनी न डगमगता पुढे येऊन तक्रार नोंदवावी, जेणेकरून या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचता येईल, असे आवाहन केले आहे.
११ कोटी ४८ लाख ४०.०२१ रुपयांच्या फसवणूकप्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कैलास लांडगे (बाबूपेठ, चंद्रपूर) आणि संजय हांडेकर (वासेरा, ता. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर) या दोन आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतलेल्या आरोपींनी लोकांना १० ते १२ टक्के व्याज दरमहा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फॉरेक्स ट्रेडिंग अॅपद्वारे पैसे गुंतवले होते. २०२२ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत ३२३ लोकांनी या अंतर्गत ही गुंतवणूक केली होती. सुरुवातीला गुंतवणुकीवरील व्याज त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. परंतु नंतर खात्यात पैसे येणे बंद झाल्याने यातील फसवणूक लक्षात आली होती.