२०२५ चे नवे वर्ष सुरु झाले. इंग्रजी वर्षाच्या तारखेप्रमाणे आपले दैनंदिन व्यवहार होत असले तरी आपले सण उत्सव आपण पंचांगातील तिथीनुसार साजरे करतो. ३ जानेवारी रोजी विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2025) आहे, त्या दिवशी काही जण उपास करतात तर काही जण फक्त बाप्पाची पूजा करतात, स्तोत्र म्हणतात. ते काहीही असो, पण चतुर्थी ही बाप्पाची आवडती तिथी आहे त्यानिमित्ताने बाप्पाला नैवेद्य दाखवणे ओघाने आलेच. हा नैवेद्य कोणता करावा हा विचार करत असाल तर पुढे दिलेले तीन पर्याय पाहा.
मोदक :
विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करावेत. मोदक या शब्दातच मोद अर्थात आनंद दडलेला आहे. म्हणूनच बाप्पालाही ते प्रिय आहेत. असे म्हटले जाते की मोदक अर्पण केल्याने व्यक्तीला चांगले फळ मिळू शकते. नवीन वर्षात काही संकल्पसिद्धी करायची असेल तर बाप्पाचे आशीर्वाद घेऊन मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि आपला मनोदय सांगा. बाप्पाचा आशीर्वाद मिळेल.
तिळाचे लाडू :
असे मानले जाते की बाप्पाला तिळाचे लाडू अर्पण केल्याने व्यक्तीचे ग्रह दोष दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. याशिवाय कामाच्या ठिकाणी समस्या येत असतील तर बाप्पाला तिळाचे लाडू अर्पण करणे फायदेशीर ठरू शकते. येत्या महिन्यात १ फेब्रुवारी रोजी तिलकुंद चतुर्थी आणि माघी गणेशोत्सव आहे. तेव्हाही हा प्रसाद बाप्पाला अर्पण करायचा आहे.
नारळाचे लाडू :
नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याचा उपयोग पुजेत अनेकदा केला जातो. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. असे मानले जाते की नारळाचे लाडू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करतात. तसेच नारळ हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते आणि बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे. म्हणून नारळापासून बनवलेले लाडू बाप्पाला अर्पण केल्याने ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते. नारळ हे समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. या प्रसादाने घरात सुख-समृद्धी येते.