Vitthal Rukmini Murti Vajralep: महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूरचा विठुराया. आषाढी आणि कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो वारकरी, भाविक विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. केवळ याच दरम्यान नाही, तर वर्षभर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक नेहमीच गर्दी करत असतात. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरात सुमारे सव्वा ते दीड कोटी भाविक पंढरपुरात येत असतात. विठुरायाच्या मूर्तीवर आता वज्रलेप केला जाणार आहे.
पंढरपुरात येणारे लाखो भाविक विठुरायाच्या मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतात. अनेक वर्षांपासून मूर्तीवर झालेल्या महापुजांमुळे मूर्तीची झीज झपाट्याने होत गेली. यासाठीच वज्रलेप केले जाणार आहे. पुरातत्व विभागाच्या रासायनिक विभागाने मूर्तीची पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार वज्रलेप करण्यात येणार आहे. २००९ पासून या महापूजा बंद करण्यात आल्या. मात्र, मूर्तीचे संवर्धन व्हावे झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला.
दर पाच वर्षांनी लेप देण्याच्या पुरातत्व विभागाच्या सूचना
१९ फेब्रुवारी १९८८ साली मूर्तीवर पहिल्यांदा लेप देण्यात आला होता. यानंतर २४ मार्च २००५ आणि शेवटची प्रक्रिया १८ ते २० मार्च २०१२ मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. कोरोना काळात म्हणजे २३ जून २०२३ रोजी चौथ्यांदा वज्रलेप केला. दर पाच वर्षांनी लेप द्यावा, अशा सूचना पुरातत्व विभागाच्या आहेत. या बाबत पुरातत्व विभागातील रासायनिक विभागाचे तज्ज्ञ मंडळींनी येथील मंदिरातील दोन्ही मूर्तींची पाहणी केली. त्या बाबतचा अहवाल मंदिर समितीला दिला.
दरम्यान, पुरातत्व विभागाच्या निकषानुसार हा वज्रलेप करण्यात येणार आहे. सद्यस्थितीला विठ्ठल आणि रखुमाईची पायाची झीज झाली आहे. त्याच बरोबरीने मूर्तीचे संवर्धन व आयुर्मान वाढविण्यासाठी वज्रलेप करण्याची सूचना पुरातत्व विभागाने दिली आहे. आषाढी यात्रेपूर्वी वज्रलेप करण्याचे नियोजन मंदिर समितीचे आहे.