Shree Swami Samarth Prakat Din 2025: ‘शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो। हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो॥’ ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचेश्री स्वामी समर्थ मानले जातात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. ब्रह्मांडनायक, कृपासिंधू स्वामींचे मठ अनेक ठिकाणी आहेत. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशात स्वामींचे मठ असल्याचे पाहायला मिळते.
अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. स्वामींसमोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात. केवळ अक्कलकोट नाही, तर जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. स्वामींसमोर गेल्यावर समर्पणात नम्र भाव असावा, असे म्हटले जाते. स्वामींच्या मठात गेलो की, मनाला वेगळीच शांतता लाभते. अद्भूताची दिव्य अनुभूति अनुभवास येते, अशी अनेक भाविकांची भावना असते.
कृपासिंधू स्वामींच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे?
स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येक जण काही ना काही ‘मन की बात’ बोलून दाखवत असतो. अनेक जण स्वामींसमोर जाऊन उभे राहतात. स्वामींसमोर गेल्यावर काय बोलावे, काय सांगावे, याचे भान राहत नाही. कारण स्वामींचे दर्शन घेताना मनोवस्था उच्च पातळीला पोहोचते, असेही अनेक जण सांगतात. अनेकांना स्वामींकडे पाहात राहावेसे वाटते. कितीही वेळ स्वामींसमोर बसले, तरी समाधान होत नाही, असेही अनेकांचे अनुभव होत आहेत. अनेक जण आपल्या अडचणी, समस्या, गाऱ्हाणी स्वामींकडे मांडत असतो. त्यातून मुक्तता मिळावी, दिलासा मिळावा, यासाठी स्वामींची करुणा भाकत असतो. स्वामींची कृपा व्हावी, स्वामींनी गाऱ्हाणे ऐकून मदतीला धावून यावे, असे भाविक मागत असतात. परंतु, स्वामींच्या दारात गेल्यानंतर, स्वामी चरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांडनायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमके काय मागावे, हेच अनेकांना कळत नाही, समजत नाही, असे म्हटले जाते.
नम्रपणे नतमस्तक व्हावे, स्वामी दोन्ही हातांनी भरभरून देणारी गुरुमाऊली
कृपासिंधू सद्गुरूच्या अर्थात स्वामी महाराजांच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे, याचा विचार अनेकदा केला जात नाही. स्वामींसमोर उभे राहिलो की, आपण काय मागतो, तर महाराज मला कार द्या, वाहन द्या, महाराज बंगला द्या, महाराज मला ऐश्वर्य द्या. पण लक्षात ठेवा की, सुख, समृद्धी, शांतता, आयुरारोग्य, संतती, संपत्ती, जय-लाभ, काम-धर्म-अर्थ-मोक्ष देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो, जो ऐश्वर्याचा अधिपती आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या नायकाच्या दारात जाऊन काय मागावे, हे आपल्याला कळले पाहिजे, असे सांगितले जाते. स्वामी दोन्ही हातांनी भरभरून, मनमोकळेपणे देणारी माऊली आहे. त्यामुळे खुद्द स्वामी देणार असतील, तर नेमके काय मागावे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसे आचरणही केले पाहिजे. आचरण करणे सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. केवळ विचाराने नाही, आचरणानेही आपण आपली कृती ठेवावी, असे म्हटले जाते.
स्वामी नक्कीच आपली पाठराखण करतील
प्रत्यक्ष परमेश्वर असलेल्या स्वामींकडे खरेच काय मागायचे असेल, तर म्हणावे की, सुख दे. कारण सुख मागितले की, त्यात सगळे आले. सुख मागत असताना स्वामींना सांगावे की, असे सुख द्या की, ज्या सुखात तुम्ही सदैव आमच्यासोबत असाल. गुरूमाऊली स्वामी आपल्यासोबत असतील तर, दुःखाच्या काट्यांवरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत पोहोचू शकतो, हे कायम आवर्जून ध्यानात ठेवावे. स्वामी सदैव पाठराखण करत असतात. पाठराखण करत असताना, स्वामी सदैव आमच्यासोबत राहा, हे मागा. स्वामी नक्कीच आपली पाठराखण करतील. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामी महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥