शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रपंच-परमार्थासह शक्ती-भक्ती-युक्तीचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे समर्थ रामदास स्वामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 11:34 IST

Dasnavmi 2024: रामदास स्वामींची उपदेशाची भाषा अत्यंत साधी व सोपी होती. जाणून घ्या...

Dasnavmi 2024: रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. यंदा २०२४ रोजी ०५ मार्च रोजी दासनवमी आहे. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज ! या नावातच सर्व काही आले. त्यांच्या समग्र चरित्राचे व उपदेशाचे सार वरील पाच शब्दांमध्ये पूर्णपणे सामावलेले आहे. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...

धगधगते वैराग्य, अपार उत्साहपूर्ण व उत्फुल्ल चर्या, हनुमंतांसारखी पीळदार शरीरयष्टी, सूर्यासमान तेजस्विता, ससाण्यासारखीच चाणाक्ष नजर, अचूक चौफेर निरीक्षण, सागराप्रमाणे गहिरे ज्ञान, हिमालयासारखी उत्तुंग बोध-प्रतीती, उसळत्या गंगौघासारखी अवखळ पण सुमधुर वाणी, अद्वितीय काव्यप्रतिभेची, अलौकिक ऋतंभराप्रज्ञेची वैभवसंपन्न रत्नखाण, पराकोटीची संवेदनशीलता, मायेहूनही मवाळ व बुडत्या जनांचा अपरंपार कळवळा असणारे विशाल हृदय, अपार भगवत्प्रेम, दास्यत्वाची चरम अनुभूती सांगणारी अनन्य शरणागती ; या व अशा असंख्य सद्गुणांची घनीभूत प्रसन्न श्रीमूर्ती म्हणजेच राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज! समर्थ रामदास स्वामींच्या वडील सूर्याजीपंत ठोसर निस्सीम सूर्योपासक होते. गंगाधर व नारायण या दोन पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदास स्वामींचा जन्म रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस झाला. 

चिंता करितो विश्वाची

नारायण लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे, असा त्याचा बाणा असायचा. नारायणाने मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. रामदास स्वामींच्या बालपणाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा नारायण लपून बसला. काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. काय करीत होता, असे विचारल्यावर, आई, चिंता करितो विश्वाची, असे उत्तर त्याने दिले होते.

सतत हिंमत देत स्वत्व जागृत ठेवले

विलक्षण दूरदृष्टीने समर्थ रामदास स्वामींनी ११०० पेक्षा जास्त मठांची स्थापना केली. हरिकथा ब्रह्मांड भेदून पल्याड नेली. बलभीमाची मंदिरे स्थापून, शरीर कमविण्याचा पायंडा घालून त्यांनी तरुणांमध्ये एक अपूर्व स्वत्व-जाणीव निर्माण केली. स्वधर्म व स्वराष्ट्राविषयी निस्तेज होऊ लागलेल्या समाजात नवचेतना निर्माण केली. विवेकाचे, वैराग्याचे व प्रयत्नांचे महत्त्व पुनश्च अधोरेखित करून हिंदूधर्मावर जमलेली राख फुंकून टाकून, तो दिव्य धर्म-स्फुल्लिंग त्यांनी पुन्हा चेतवला. त्याकाळी परकीय आक्रमणांमध्ये, मोगली राजवटीतही, समर्थांनीच आपल्या मराठी समाजाचे मन खचू न देता, सतत हिंमत देत स्वत्व जागृत ठेवले. सद्गुरु समर्थ श्रीरामदास स्वामी महाराजांचे महाराष्ट्राच्या पावन भूमीतील ओजस्वी संतपरंपरेत आगळे-वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे अढळस्थान आहे.

रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण

समर्थ रामदास स्वामींनी पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी त्याकाळी प्रस्थापित केला. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून ते दररोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे सांगितले जाते. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. तपश्चर्या संपल्यानंतर समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. सारा हिंदुस्थान पालथा घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले.

खणखणीत वाणीने लोकांना उपदेश केला

वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले. समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. रामदास स्वामींची उपदेशाची भाषा अत्यंत साधी व सोपी होती. १२ वर्षाच्या प्रवासांत रामदास स्वामींनी जे पाहिले, ते भयंकर होते. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरेल. समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली. तेव्हा रामदास स्वामींनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना उपदेश केला.

अखंड ऊर्जेचा खळाळता स्रोत

सर्व बाबतीत सतत सावधानता बाळगून, नेटकेपणे पण अलिप्ततेने संसार करीत करीतच परमार्थ साधण्याचा मौलिक उपदेश देऊन, प्राप्त परिस्थितीतही योग्य पद्धतीने हरिकथेचा कल्लोळ करावयास सांगणारा, सांगितल्याबरहुकूम स्वत:ही वागून दाखवणारा समर्थ रामदास स्वामी अद्वितीयच म्हणायला हवेत. कुबडीमध्ये गुप्तपणे शस्त्र बाळगणारे आणि जोर-बैठका, सूर्यनमस्काराचा सतत पुरस्कार करणारे समर्थ, बलभीमाचे सच्चे उपासक होते. बलवान साधकच परमार्थातही पूर्णत्वास जातो, ही त्यांची सार्थ शिकवण होती. "मनाची शते ऐकता दोष जाती ।" असे छातीवर हात ठेवून सांगणारी त्यांची समग्र रचना, साधकांसाठी अनंतकाळपर्यंत मार्गदर्शक आहे, तीच आपल्या साधनेचे अमृतमधुर पाथेय आहे. अखंड ऊर्जेचा खळाळता स्रोत आहे.

रामदास स्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते 

रामदास स्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रह्म हेच सत्य आहे, हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. परब्रह्म, मूळमाया, गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, विश्वाची उभारणी व संहार, पिंड-ब्रह्मांड रचना व त्यांचे संबंध, अशा अनेक विषयांचे चिंतन समर्थांच्या साहित्यात आहे. सर्व कर्मांचा कर्ता हा राम असून, आपण मिथ्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपण घेतो, असे ते नेहमी सांगत. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच उपयोगाचा नाही. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे, असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. भोंदू गुरू व बावळट शिष्य हे परस्परांचे नुकसान करतात, असे त्यांनी सांगितले आहे. कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गांचे अनुसरण करून मुक्त होण्याचे सर्वोच्च लक्ष्य त्यांनी शिष्यांपुढे ठेवले, अनेक दंडक घालून दिले.

समर्थ रामदास स्वामींनी अफाट, विपुल वाङ्‌मय निर्मिती केली

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट, विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ, सुखकर्ता दुखहर्ता, ही गणपतीची आरती, लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा, ही शंकराची आरती, अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. याशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, अनेकविध अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक आदी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव व नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण ही समर्थांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.

सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. माघ वद्य नवमीला तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हीच तिथी पुढे श्रीरामदास नवमी म्हणून प्रसिद्ध झाली. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक