Shree Swami Samarth Maharaj Seva For 2025: सन २०२४ ची सांगता होत आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी या वर्षाचा शेवटचा गुरुवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवार हा दिवस गुरु ग्रहाला समर्पित आहे. तर, भारतीय परंपरांमध्ये गुरुवार हा दिवस दत्तगुरुंना समर्पित असून, या दिवशी दत्तावतारांचेही विशेष पूजन केले जाते. दत्तावतार असलेल्या ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांची गुरुवारी विशेष सेवा केली जाते. कोट्यवधी भाविक न चुकता नित्यनेमाने गुरुवारी स्वामी सेवा करत असतात.
श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला, तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा, नामस्मरण केले जाते. अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत. या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात. स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्यक्ष मठात जाणे, स्वामींचे नित्यनियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नये. स्वामी समर्थ मानस पूजा करावी, असे म्हटले जाते.
‘अशी’ करा स्वामी सेवा, होईल अपार कृपा
गुरुवारी लवकर उठून स्नानादि कार्ये उरकल्यानंतर स्वामींचे विशेष पूजन करावे. शक्य असेल तर स्वामींची षोडषोपचार पूजा करावी. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. मनोभावे पूजन केल्यानंतर स्वामींना आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. मनापासून स्वामींना नमस्कार करावा. स्वामींच्या प्रसादाचे सर्वांना वाटप करावे. तसेच स्वामी मंत्राचा यथाशक्ती जप करावा. स्वामी स्तोत्रांचे पठण करावे. हजारो भाविक आपापल्या पद्धतीने स्वामी सेवा करत असतात, ती तशीच सुरू ठेवावी. त्यात खंड पडणार नाही, याची अधिकाधिक काळजी घ्यावी. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनात असले तरी मनासारखी स्वामी सेवा करता येतेच असे नाही. अशा वेळी स्वामींचे मनापासून नामस्मरण करावे. जेव्हा शक्य होईल, तेव्हा कंटाळा न करता आवर्जून स्वामी सेवा करावी. स्वामी महाराज मनातील भाव पाहतात, त्यामुळे सेवा निर्मळ मनाने करावी. अशी सेवा स्वामी चरणी रुजू होते, अशी अनेकांची भावना आहे. अखंडितपणे स्वामी सेवा करत राहून स्वामींच्या अपार कृपेस पात्र होण्याचा प्रयत्न करावा.
२०२५ साठी काय संकल्प करता येऊ शकेल?
नवीन वर्ष सुरु होताना अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करत असतात. ते कधी पूर्ण होतात, कधी अपूर्ण राहतात. स्वामी सेवेसंदर्भात आपण काही संकल्प करू शकतो. त्यासाठी सर्वांत पहिल्यांना स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. विश्वास असेल तरच आपल्या सेवा, प्रार्थना, पूजन यांना गुरुबळ मिळते. आपण अखंडितपणे स्वामी सेवा करत आहोत, पण आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही, अशी भावना होत असली तरी धीर धरावा. स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवावी, विश्वास वृद्धिंगत करावा. दर गुरुवारी आपल्या हातून काही ना काही स्वामींची सेवा होईल, असे पाहावे. आपले काम, आपले शेड्युल, कामाची दगदग, कौटुंबिक, सामाजिक, करिअर, नोकरीतील जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वामी सेवेचा संकल्प करता येऊ शकेल. जो संकल्प कराल, तो पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. काहीच शक्य झाले नाही तरी स्वामींची मानसपूजा करावी, स्वामींचा तारक मंत्र आवर्जून म्हणावा. म्हणता येणे शक्य नसेल तर श्रवण करावा. मनापासून स्वामींचे नामस्मरण करावे. वर्षातून एकदा तरी गुरुलीलामृत याचे पठण करावे. काम प्रामाणिकपणे करत राहावे. शक्यतो कुणालाही दुखवू नये. यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करत राहावी. सदाचाराची कास धरावी. जे काही यश मिळेल, प्रगती होईल, आनंद होईल, चांगले होईल, ते स्वामींचरणी अर्पण करावे. आपला स्वामी सेवेचा नित्य नियम सोडू नये.