भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला. ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते. हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. यंदा रामनवमी १७ एप्रिल, रविवारी साजरी होणार आहे. रामनवमीच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवन आनंदाने भरून जाऊ शकते.
मुळातच रामाला आनंदाचे धाम म्हटले आहे. रामाचे चरित्र अभ्यासले तर लक्षात येईल, की राजपुत्र असूनही, ईश्वरी अवतार असूनही त्याच्या वाट्याला सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात येतात तसे अनेक पेच प्रसंग आले, संकटं आली. तरी त्या सर्वावर मात करत रामाने धीरोदात्तपणे संकटांचा सामना केला. वेळोवेळी चांगले लोक जोडत लोकसंग्रह केला. आपल्या विचाराबरोबरच अनुभवी, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कनिष्ठ मंडळींचाही सल्ला घेतला. संघटना तयार करून रावणासारख्या बलाढ्य सत्तेशी मुकाबला केला आणि त्याचा वध देखील केला. श्रीरामांनी हे सर्व पराक्रम करताना दाखवलेले चातुर्य, युद्धनीती, विनम्रता आणि हे सगळं करताना नैतिकतेची न ओलांडलेली चौकट त्यांना आदर्श राजा बनवते. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ ईश्वर म्हणून न पाहता सामान्य व्यक्ती असामान्य पदाला कशी जाऊ शकते याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात केले पाहिजे आणि या सर्वाला जोड म्हणून राम उपासना केली पाहिजे. ती कशी करायची ते जाणून घेऊ.
राम नवमीच्या दिवशी करा हे उपाय
संकटांपासून दूर राहण्यासाठी उपाय: जर तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटाने घेरले असेल तर राम नवमीच्या दिवसापासून रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने सर्व प्रकारच्या त्रासापासून आराम मिळेल.
दु:खापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय : दु:खाच्या वेळी परमेश्वराची उपासना केल्याने व्यक्तीला सकारात्मकता आणि संयम प्राप्त होतो. रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामाची आराधना केल्याने आणि 'श्री रामचंद्र कृपालु भज मन...' अशी रामाची स्तुती केल्याने दु:ख आणि त्रासांपासून मुक्ती मिळते.
मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय: रामनवमीच्या दिवशी भगवान श्री रामाचे परम भक्त हनुमानजींची पूजा केल्याने भगवान राम प्रसन्न होतात. म्हणून रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसाचे संपूर्ण पठण करा, असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
सुख-समृद्धी मिळविण्याचे उपाय : रामाच्या नावात खूप शक्ती आहे. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची आराधना करून राम नामाचा जप केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
पुण्यप्राप्तीचा उपाय : रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरितमानस पठण करणे हे पापांचा नाश करून पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते.