PM Modi Birthday Special: मनुष्याचे खरे आयुर्मान २५ च वर्षांचे होते. मात्र तो त्याच्या मूळ स्वभावानुसार असंतुष्ट असल्याने त्याला ७५ वर्षांचे आयुर्मान दान स्वरूपात मिळाले. हे दान कोणी दिले? तर...
जेव्हा ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली, त्यावेळी ईश्वराने प्रत्येक प्राण्याचे आयुष्य निश्चित केले. प्रत्येकी पन्नास वर्षे. मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती असल्याने मनुष्याला घडवायला देवाला अधिक वेळ लागला. म्हणून मग देवाने माणसाला आयुष्य दिले, फक्त पंचवीस वर्षे. सगळ्या प्राण्यांना-पक्ष्यांना पन्नास वर्षे आयुष्य आणि आपल्याला फक्त पंचवीस वर्षे? मनुष्य बुद्धिवादी प्राणी असल्याने त्याला वाटू लागले की ईश्वराने आपल्यावर अन्याय केला आहे. त्याने ईश्वराजवळ तक्रार केली. `देवा, पंचवीस वर्षांच्या आयुष्यात मला काहीच आनंद मिळवता येणार नाही. थोडे अधिक आयुष्य वाढवून दिले असते तर...'ईश्वराने सांगितले, `माझ्या व्यवस्थेप्रमाणे मी वाटप केले आहे़ जर तुला ते कमी वाटत असेल, तर त्या प्राण्याला आपले आयुष्य जास्त वाटत असेल, तर त्याच्याकडून तू खुशाल घेऊ शकतोस.'थोड्या वेळाने बैल आला आणि ईश्वराला म्हणाला, `देवा पन्नास वर्षे आयुष्य माझ्यासाठी खूप जास्त होईल. त्यातले पंचवीस वर्षे कमी केले तर बरे होईल.'ईश्वराने म्हटले, `ठीक आहे, तुला नको असलेले पंचवीस वर्षे मनुष्याला दे.'माणसाने बैलाकडची पंचवीस वर्षे आयुष्य आनंदाने स्वीकारले. थोड्या वेळाने कुत्रा आला, तोही तेच सांगू लागला.`देवा, पन्नास वर्षे आयुष्य खूप होईल. मला पंचवीस वर्षेच पुरे!'देवाने त्याच्या आयुष्यातील पंचवीस वर्षे कमी करून मनुष्याला दिली. पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य मिळूनही मनुष्य समाधानी नव्हता. त्याला पूर्ण १०० वर्षे आयुष्य हवे होते.तेवढ्यात घुबड आले. त्यानेही पंचवीस वर्षे आयुष्य मागून वरची पंचवीस वर्षे मनुष्याला दान केली. अशा रितीने मनुष्याचे आयुष्य १०० वर्षे पूर्ण झाले.
अशी एक गोष्ट मनुष्याच्या आयुर्मानाबाबत सांगितली जाते. त्यामुळे मिळालेला प्रत्येक दिवस हा बोनस समजून जगा आणि जगण्याचा उत्सव करा असे आपले पूर्वज म्हणत असत. त्यातूनच निर्माण झाली दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याची आणि ठराविक वर्षांनी महोत्सव साजरा करण्याची परंपरा! यात वर्षांनुसार पुढील विशेषणे दिली जातात.
रौप्य महोत्सवी वर्ष - २५ वर्षांची पूर्तीसुवर्ण महोत्सवी वर्ष - ५० वर्षांची पूर्तीहीरक महोत्सवी वर्ष - ६० वर्षांची पूर्तीअमृत महोत्सवी वर्ष - ७५ वर्षांची पूर्तीशताब्दी महोत्सवी वर्ष - १०० वर्षांची पूर्तीशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष - १२५ वर्षांची पूर्तीशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष - १५० वर्षांची पूर्तीशतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष - १६० वर्षांची पूर्तीशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष - १७५ वर्षांची पूर्तीद्वीशताब्दी महोत्सवी वर्ष - २०० वर्षांची पूर्ती
या वर्षी आपण पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर यांचा त्रीशताब्दी जयंती महोत्सव साजरा करत आहोत. त्यांचे कार्य किती दिव्य होते, हे यावरून लक्षात येईल. तीच बाब पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची! आज मोदींचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस(PM Modi 75'th Birthday) देश-विदेशात उत्साहाने साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच!