- दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)भाद्रपद द्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. यावर्षी सोमवार, ८ सप्टेंबर ते रविवार, २१ सप्टेंबर २०२५ ‘पितृपक्ष’ आलेला आहे. समाजात पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत.आपल्या मृत आप्तेष्टांचे आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबाच्या घरी राहायला येतात, अशी समजूत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी दररोज महालय - श्राद्ध करावे असे शास्त्रात म्हटले आहे.
हे श्राद्ध करताना पिता म्हणजे वडील, पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह म्हणजे पणजोबा, माता म्हणजे आई, पितामही म्हणजे आजी आणि प्रपितामही म्हणजे पणजी यांच्यापैकी जे कोणी मृत असतील त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करण्यात येतो. जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे.
भाद्रपद कृष्ण पक्षातच श्राद्ध करण्यास का सांगितले आहे, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होते. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘मातीच्या गणेशमूर्तीचे’ म्हणजेच पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे.
पितृपक्षाविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आढळतात. ‘पितृपक्ष हा वाईट आहे, पितृपक्ष हा अशुभ आहे. पण त्यात तथ्य नसते. हे सर्व गैरसमज असतात. पितृपक्ष हा वाईट नसतो तसेच तो अशुभही नसतो. तुम्हीच विचार करा की भाद्रपद कृष्णपक्षात म्हणजेच पितृपक्षात जर आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या घरात राहायला येणार असतील तर ते वाईट कसे असू शकेल.
ज्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिले, घर, धनसंपत्ती ठेवली त्यांचे आत्मे या पंधरा दिवसासाठी आपल्या घरात राहायला येणार असतील तर त्यात अशुभ कसे असू शकेल? उलट आपल्या चांगल्या कामांना व परिस्थितीला पाहून त्या आत्म्याना आनंद-समाधानच वाटेल ना? उलट त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा आपल्या प्रत्येक कामाला मिळतील होय ना? हा, पण जर आपले पूर्वज जिवंत असताना आपण त्यांचे हाल केले असतील तर मग मात्र आपणास पूर्वजांच्या आत्म्याची भीती वाटणे साहजिकच आहे. परंतु ९९.९९ टक्के तरी तसे नसते.
मित्रांनो, या वर्षापासून आपण आपल्यात असा चांगला बदल घडवूया. पितृपक्षातील हे दिवस अशुभ न मानता पितरांचे स्मरण करूया. समाजातील गरीब गरजूंना मदत करून आपल्या पितरांचे श्राद्ध करूया म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळतील.