Pitru Paksha 2025:पितृपक्ष सुरू आहे. पितृ पंधरवड्यात पूर्वजांचे स्मरण केले जाते. कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध त्यांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, पितृपक्षातील त्याच तिथीस केले जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षात श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध विधी पूर्वजांना प्रसन्न करतात. त्यामुळे त्यांचे कृपाशिर्वाद प्राप्त होतात, असे म्हटले जाते. परंतु, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा लाभावी, अशी इच्छा असल्यास पितृपक्षात काही गोष्टी कराव्यात, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
एका मान्यतेनुसार, प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. परंतु, सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र, महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा वद्य पक्षाचा पंधरवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे, असे सांगितले जाते.
पूर्वजांच्या मृत्यू तिथीला श्राद्ध: कुटुंबातील सदस्यांचे निधन ज्या तिथीला झाले असेल, त्या पितृपक्षातील तिथीला कुटुंबातील त्या सदस्याच्या नावाने विधीवत श्राद्ध तर्पण विधी करावा, असे सांगितले जाते. पितृपक्षात श्राद्ध केले नाही, तर पूर्वजांचा आत्मा अशांत राहतो. पितृपक्षात दिवंगत पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबाला सुख, समृद्धी, ऐश्वर्याचा शुभाशिर्वाद देऊन जातात. असे केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
कौटुंबिक सुख, समृद्धीत वाढ: पितृपक्षात दररोज पूर्वजांच्या नावाने तर्पण करावे. शक्य असल्यास दररोज किंवा ज्या दिवशी श्राद्ध विधी केला जाईल, त्या दिवशी कबूतर, कावळे यांसारख्या पक्षांसाठी काही पदार्थ घराबाहेर किंवा छतावर ठेवून द्यावेत. कोणत्याही पशु-पक्ष्यांचा अपमान करू नये, त्यांना त्रस्त करू नये. तो काकबळी ग्रहण केल्यास तो थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतो, अशी लोकमान्यता आहे. असे झाल्यास पूर्वज प्रसन्न होतात. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभते. घरात सुख, समृद्धी, स्थैर्य येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
पंचग्रास दान: श्राद्धाच्या दिवशी पंचग्रास दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. यामध्ये गाय, मांजर, कावळा, कुत्रा आणि अधिक रहदारी नसलेल्या ठिकाणी भोजनातील काही भाग ठेवून द्यावा आणि पाठीमागे न वळता, न पाहता थेट निघून यावे. ते भोजन पूर्वज ग्रहण करतात. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील वारसांना शुभाशिर्वाद देतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये. शक्य झाल्यास केवळ श्राद्धाच्या दिवशी नाही, तर नियमितपणे पशु-पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे, असे सांगितले जाते.
लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद: भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे, हा तर भारतीय संस्कार प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे. त्याचे पितृपक्षात अधिक महत्त्व आहे. पितृपक्षात कोणाचाही अपमान करू नये, असे सांगितले जाते. या कालावधीत घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये, असे सांगितले जाते. तसेच गरजू व्यक्तींचा अनादर करू नये. या कालावधीत त्यांनाही अन्न-पाणी द्यावे. गरजूंची गरज भागवताना आपले चित्त प्रसन्न ठेवावे. मनापासून या गोष्टी कराव्यात. असे केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य वृद्धिंगत होते, अशी मान्यता आहे.
- श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे एकत्रितपणे स्मरण केल्याने वंशवेल समजते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते. त्यांच्या कार्याची , समाज व कुटुंबासाठीचे योगदान याबद्दल माहिती मिळते. पूर्वजांच्या अभिमानास्पद कामगिरीने उर्वरितांचा आत्मविश्वास वाढतो व पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणा मिळत राहते. पितृपक्षाच्या निमित्ताने पूर्वजांचे स्मरण आणि प्रार्थना करावी. या कालावधीत सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, मद्यपान टाळावे. ब्रह्मचर्य पाळावे. कुटुंबातील सदस्य आनंदी आणि प्रसन्न असल्याचे पाहून पूर्वजांनाही बरे वाटते. यामुळे आनंदी चित्ताने पुन्हा पितृलोकांत जातात. याचे लाभ वारसांना होतात, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.